धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:58 IST2025-01-16T18:58:29+5:302025-01-16T18:58:58+5:30
उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून मृत कावळ्यांची नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू
लातूर : दोन दिवसांपासून उदगिरात अचानकपणे कावळे दगावल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी आणखीन ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्याची तातडीने दखल घेत मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने औंध येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, उपाययोजनेसाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
उदगिरातील महात्मा गांधी उद्यान व हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय परिसरात १३ जानेवारी रोजी २८ कावळे मृतावस्थेत आढळले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पांडे यांनी तात्काळ मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, १४ रोजी ८, तर बुधवारी आणखीन ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्यामुळे एकूण मृत कावळ्यांची संख्या ४१ झाली आहे. मयत कावळ्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळेचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. मनोज घाटे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एस. आर. साळवे यांच्या पथकाने बुधवारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच उदगीर तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पीपीई किट्स, ग्लोव्हज, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित
औंधच्या प्रयोगशाळेतून नमुना निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात इतरत्र पशु -पक्ष्यांत कोणत्याही प्रकारची अनपेक्षित मृत्यूची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना प्रमुखांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.