खळबळजनक! पेठ शिवारात बालकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळला, ओळख पटविणे सुरू
By राजकुमार जोंधळे | Published: January 19, 2024 06:45 PM2024-01-19T18:45:08+5:302024-01-19T18:46:41+5:30
मृताची ओळख पटविण्यासाठीचे प्रयत्न; पोलिसांकडून महामार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी
लातूर : शहरानजीक असलेल्या पेठ गावच्या शिवारात एका सातवर्षीय अनोळखी मुलाचा अर्धवट अवस्थेत पुरलेला मृतदेह आढळला. याबाबत सध्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मात-पित्यासह आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाय, इतर स्थानिक पोलिसांकडूनही तपास केला जात आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील टोल नाके, हॉटेल्सवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
पोलिसांनी सांगितले, पेठ शिवारात लहान अनोळखी मुलाचा मृतदेह परवा आढळून आला होता. दरम्यान, लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. आता याच प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. यासाठी स्थानिक पोलिसांसह इतर तीन पथकांची जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नियुक्ती केली आहे. या पथकाला तपासाच्या अनुषंगाने सुचना केल्या आहेत. या बालकाचा कोणी, कोणत्या कारणासाठी खून केला आहे का? त्या बाजूनेही तपास केला जात आहे. शिवाय, लातूरसह इतर जिल्ह्यातील कोणी मुले मिसिंग आहेत का? याचाही कसून शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर माता-पिता आणि नातेवाईकांचाही शोध घेतला जात आहे.
तीन दिवसांपासून ओळख पटविण्यासाठीचे प्रयत्न
पेठ शिवारात अर्धवट अवस्थेत पुरलेल्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे तीन दिवस झाले प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी; आरोपीचा पोलिसांकडून माग...
या बालकाचा खून करण्यात आला असावा, त्यानुसार पोलिस आरोपींचा मग काढत आहेत. शिवाय, मृत मुलाच्या माता-पित्याचाही शोध घेतला जात आहे. यातील कोणाचाही धागा हाती लागला तरमृतदेह आणि गुन्ह्याचा उलगडा होणार आहे. सध्या वेगवेगळ्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील विविध टोल नाके, ढाबे, हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपाससले जात आहेत. यातून काहीतरी लवकरच हाती लागेल.
- सोमय मुंडे, पोलिस अधीक्षक, लातूर