धक्कादायक ! सूर्यग्रहण काळात आठ दिव्यांग मुलांना गळ्यापर्यंत पुरून ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 06:20 AM2019-12-27T06:20:11+5:302019-12-27T06:20:43+5:30
कर्नाटकात अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार; पोलिसांनी केली मुलांची सुटका
बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : सूर्यग्रहणात मुलांना चिखलात/उकिरड्यात गळ्यापर्यंत पुरून ठेवले तर त्यांचे अपंगत्व दूर होते, या अंधश्रद्धेपोटी कर्नाटकातील तीन गावांत गुरुवारी आठ मुलांना पुरून ठेवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या अघोरी प्रकाराची व्हिडिओक्लिप व्हायरल होताच विभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना पुरलेल्या स्थितीतून खड्ड्यातून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.
कलबुर्गी व बीदर जिल्ह्यातील गावांमध्ये हा प्रकार घडला. लातूर जिल्ह्याला जवळ असलेल्या बीदर जिल्ह्यातील औराद बाºहाळी तालुक्यात चिंचोळी व अफजलपूर येथील एकूण पाच मुलांना असे गळ्यापर्यंत पुरलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यात आले, तर कलबुर्गी जिल्ह्यातील ताज सुलतानपूर येथील तीन मुलांचीही या जीवघेण्या प्रकारातून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘आमच्या वडीलधाऱ्यांनी जे सांगितले तेच आम्ही केले. वैद्यकीय उपचारांचा काही उपयोग न झाल्यामुळे हा उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या उपचाराने आमची मुले बरी होतील की नाही हे आम्हाला माहीत नाही. पण वैद्यकीय उपचारांनी फरक न पडल्यामुळे हा उपचार करून पाहायचा होता’, असे एका मुलीच्या वडिलांनी सांगितले.
आणखी एका मुलाच्या आईने सांगितले की,‘आम्ही रुग्णालयांत फार पैसा खर्च केला. ग्रहणात असा
उपाय केल्यावर चांगला फरक पडतो असा समज असल्यामुळे आम्ही आता हा प्रयोग करून पाहिला.’ इंदी आणि विजापूर जिल्ह्यांतही दोन अशाच घटना घडल्याचे वृत्त आहे. या आधीही या भागात सूर्यग्रहण असताना असे उपाय झाले होते. मात्र आता त्यांची संख्या कमी झाल्याचे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सर्व मुलांना दत्तक घेणार ताजसुलतानपूर गावचे मठाधीश सडपूल स्वामी म्हणाले, ही घटना माझ्या गावात घडली, याची लाज वाटते. आम्ही त्यांना बाहेर काढण्यास सांगितले होते. यासंदर्भात कलबुर्गी येथील डॉ. कामरेड्डी म्हणाले, सर्व मुलांना दत्तक घेऊन उपचार करणार.
अज्ञातून अघोरी प्रयोग
ताजसुलतानपूर येथील मुलांची वये ३, ८ व ११ वर्षे असून तिघेही दिव्यांग आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये जाऊनही अपंगत्व दूर झाले नाही. त्यामुळे अज्ञानापोटी त्यांच्या आई-वडिलांनी हा प्रकार केल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी हुल्लूर आणि तहसीलदार मलेश यांनी दिली.
जनजागृती अभियान राबविणार :कलबुर्गीचे उपायुक्त बी. शरथ म्हणाले, ‘घटनेची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यासंदर्थात जनजागृती अभियान राबविले जाणार आहे.’