धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:49 IST2025-04-10T19:49:00+5:302025-04-10T19:49:28+5:30
शेतात उभारला ड्रग्स बनवण्याचा कारखाना; पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या.

धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त
लातूर: चाकूर तालुक्यातील रोहिणी शिवारात ड्रग्जचा कारखाना उभारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी 11 किलो ड्रग्स जप्त केले. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात 17 कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी मुंबई पोलिस दलातील कर्मचारी आहे. प्रमोद केंद्रे, असे त्याचे नाव असून, तो आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबईतच या ड्रग्सची विक्री करत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली आणि त्यानेच केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर काही महिन्यांपूर्वीच केंद्रेने आपल्या गावाकडे माळरानावर शेड बांधले आणि त्यात ड्रग्जचे उत्पादन सुरू केले. तो मुंबईतून कच्चा माल आणायचा आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने शेतात ड्रग्स तयार करायचा.
या ड्रग्ज निर्मितीतून आरोपींनी बराच पैसा कमावला. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. त्यानेच चौकशीत प्रमोद केंद्रेच्या कारखान्याची माहिती दिली. पुणे येथील पथक रोहिणा परिसरात गेले आणि त्यांनी या कारखान्यावर धाड टाकली. या धाडीत त्यांना कोट्यवधी रुपयांचा 11 किलो कच्चा माल हाती लागला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींनाही अटक केली आहे.
आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
याप्रकरणी प्रमोद संजीव केंद्रे (वय 35 रा. रोहिणी ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (52 रा. रोहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डोंगरी, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली.