तुटवड्यामुळे रुग्णालयातील मुक्काम वाढला; बेड मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:33+5:302021-04-26T04:17:33+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेलाच आहे. सद्य:स्थितीत १५ हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. ...
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेलाच आहे. सद्य:स्थितीत १५ हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यातील चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण दवाखाने व कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. गरज असणाऱ्या अनेकांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी चालूच आहेत. दरम्यान, प्रशासनाने न्यायिक पद्धतीने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभी केल्याने दिलासाही मिळत आहे.
रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने दवाखान्यातील रुग्णांचा मुक्कामही वाढलेला आहे. त्यामुळे बाहेर वेटिंगवर असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन, आयसीयू बेडसाठी वाट पहावी लागत आहे. यावरही प्रशासन मात करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिकेच्या कार्यालयात बेड उपलब्धतेची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दोन्हीही कक्ष २४ तास सुरू आहेत. महानगरपालिकेच्या हेल्पलाईन कक्षामध्ये एकूण ६ कर्मचारी शिफ्टवाईज आहेत. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर उपलब्ध बेडची माहिती दिली जाते. कधी उपलब्ध होणार आहे, याबाबतचीही माहिती कळू शकते. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता हेल्पलाईन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आमच्या घरातील सदस्य बाधित असल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रारंभी बेड मिळत नव्हता. ऑक्सिजन बेड मिळाला तर डाॅक्टरांनी व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यासाठी वेटिंग करावी लागली. - रमाकांत, रुग्ण नातेवाईक