भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: August 27, 2022 01:38 PM2022-08-27T13:38:18+5:302022-08-27T13:40:37+5:30
चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे.
लातूर : चोरट्यांनी शटर उचकटून शोरूम फोडल्याची घटना शनिवारी औसा रोडवर भल्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, शोरूमसमोर ट्रक उभा करून टीव्ही, फ्रीज आणि इतर साहित्य असा जवळपास ३० ते ३५ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा रोड परिसरात एलजी कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्याचे शोरूम आहे. दरम्यान, चोरट्यांच्या टोळीने शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. समोर ट्रक उभा करण्यात आला. शोरूमधील टीव्ही, फ्रीज, कुलर, एलईडी, डिश असा जवळपास ३० ते ३५ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी शोरूममध्ये आणि बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्हीचा सेटच पळविला आहे. ही चोरी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, पहाटेच्या वेळी झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत.
घटनास्थळी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
चोरीच्या साहित्याची मोजदाद सुरु...
चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे. साहित्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे, अख्खा सीसीटीव्हीचा सेटच पळविला आहे. चोरट्याची टोळी सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी श्वानपथक दाखल...
घटनास्थळी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, ठसे तज्ञालाही बोलवण्यात आले होते. हे दोन्ही पथक चोरट्याचा माग काढत आहेत. शिवाय, विविध पोलीस पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.