सॉफ्टबॉलमध्ये श्रद्धा जाधवची दमदार कामगिरी; एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:50 PM2023-04-03T19:50:31+5:302023-04-03T19:50:42+5:30
होमर हिटर श्रद्धा जाधवची 'हिट' गाजली; कोरिया येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
- महेश पाळणे
लातूर : पावरफुल हिटिंगच्या जोरावर मैदान गाजविणाऱ्या लातूरच्या श्रद्धा संतोष जाधव हिने जिद्दीच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत. महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करीत किमया केली आहे. या जोरावर तिची दक्षिण कोरिया येथील इंचोन शहरात सुरू असलेल्या एशियन महिला सॉफ्टबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. उदगीर तालुक्यातील करडखेल येथील श्रद्धा जाधवने सॉफ्टबॉल खेळात यानिमित्ताने उच्चांक गाठला आहे. शालेय स्तरापासून तिने सॉफ्टबॉल खेळात लातूरला अनेक वेळा राज्य स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. जिजामाता कन्या विद्यालय व राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघांनाही तिच्या खेळाच्या जोरावर अनेक वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळाला आहे.
नुकत्याच ओडिशा येथील जगन्नाथपूर येथे झालेल्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याच कामगिरीच्या बळावर तिची भारतीय संघात निवड पक्की झाली आहे. तिला दैवशाला जगदाळे, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, शिवाजी पाटील, नारायण झिपरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाचे राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा संघटनेचे मोईज शेख, सचिव डी.डी. पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमींनी कौतुक केले आहे.
उत्कृष्ट फस्ट बेस खेळाडू...
सॉफ्टबॉल खेळात फस्ट बेसवर खेळणाऱ्या श्रद्धा जाधवने शालेय जीवनापासूनच चमकदार कामगिरी केली आहे. राज्य, राष्ट्रीय अशा अनेक स्पर्धात आपल्या कामगिरीच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला आहे. पॉवरफुल हिटिंगसह उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ती राज्यभरात प्रसिद्ध आहे. जवळपास २० राज्य व १२ राष्ट्रीय स्पर्धेत तिने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.
दोन वर्षे होती मैदानापासून दूर...
शालेय व महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रद्धाने शिक्षणासाठी पुण्याकडे धाव घेतली. दोन वर्षे शिक्षणामुळे ती मैदानापासून दूर होती. मात्र, परत सराव करीत तिने आपली लय कायम ठेवली. वरिष्ठ गटात लातूरकडून खेळत तिने हे यश संपादन केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रीय सराव शिबिरात तिने आपल्या कौशल्याची छाप सोडली. याच जोरावर तिने भारतीय संघात स्थान मिळविले असून, एशियन स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करेन, असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.