संमेलनाध्यक्षपदाच्या अनुभवांवर लवकरच येणार श्रीपाल सबनीस यांचे पुस्तक !
By admin | Published: October 14, 2016 05:52 PM2016-10-14T17:52:22+5:302016-10-14T17:54:06+5:30
श्रीपाल सबनीस हे संमेलनाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्षपदावरील एक वर्षाच्या अनुभवांवर पुस्तक लिहीत आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १४ - ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे संमेलनाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्षपदावरील एक वर्षाच्या अनुभवांवर पुस्तक लिहीत आहेत. संमेलनाध्यक्ष झाल्यापासून विविध वादात सापडलेल्या सबनिस यांच्या साहित्य संमेलनातील अनुभवांच्या गाठोड्यांच्या या पुस्तकात आता काय काय बाहेर येणार ? याची उत्सुकता मराठी वाचकांना लागली आहे.
लातूर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता श्रीपाल सबनीस यांनी याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले की, माझा अध्यक्षपदाचा आठ महिन्याचा काळ लोटला. अनेक बरेवाईट अनुभव या आठ आणि त्याआधीच्या दोन महिन्याच्या निवडणूक प्रक्रियेने दिले. हे सारे संचित शब्दबध्द व्हावी, ही माझी भावना होती. परंतु आत्ता इतक्यात त्यावर लिहावे हे काही डोक्यात नव्हते. मात्र पुण्याच्या चेतन बुक्सने या अनुभवांचे पुस्तक लवकर प्रकाशित करण्याचे ठरविले. खरेतर ही कल्पनासुध्दा त्यांनीच माझ्या पुढ्यात ठेवली आणि मला ती ऐकता क्षणी आवडली. त्यामुळे मी पुस्तकावर वेगाने काम सुरु केले आहे.
भरपूर अनुभव पाठीशी असल्यामुळे पुस्तकात काय आणि किती लिहावे ? इतके मला झाले आहे. हे सरते वर्षे माझ्या संपूर्ण आयुष्यातील सर्वाधिक वादळी आहे. मान, सन्मान आणि अपमान या तीनही छटा मी वर्षात पुरेपूर अनुभवलेल्या आहेत. निवडणुकीतील माझ्या अध्यक्ष म्हणून निवडीपर्यंतचा रोचक प्रवास, निवडूण आल्यानंतरचे वादविवाद, संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर एकाच वेळी वाट्याला आलेला मान आणि अपमान, हे वर्षभर पोलिस संरक्षणात भाषण करणे, कोणत्याही शहरात गेल्यानंतर आधी पोलिसांचा, मग ‘दोन्ही प्रकार’च्या कार्यकर्त्यांचा पडणारा गराडा, काही झालेले आणि न झालेले राडे, आलेले चित्रविचित्र अनुभव हे पुस्तकात येतील, असे ते म्हणाले.
आठ महिन्यात २८६ कार्यक्रम केले !
एखादा अपवाद सोडला तर संमेलनाध्यक्ष म्हणून मी महाराष्टÑाच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो आहे. एक नव्हे.. दोन नव्हे.. तर तब्बल २८६ कार्यक्रमांना मी पाहुणा म्हणून गेल्या आठ महिन्यात हजेरी लावली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला सहकुटुंब गेलो. प्राध्यापकीतून निवृत्त झाल्यानंतर साठीनंतर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एका वर्षात कोणताही अध्यक्ष इतका फिरला नसेल, तितका मराठी साहित्याची कावड घेऊन मी फिरलो. गदीमांच्या माडगूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पाहुणा होतो. आधीच गाव छोटेसे, त्यात भीमनगर एकदम छोटेसे. परंतु कार्यकर्त्यांनी बळ दिले. ‘श्रीपाल सबनीस यांचा विजय असो’च्या घोषणा देत स्वागत केले. हे माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहे. जे काही अपमानाचे प्रसंग आले आहेत ते ही खुप काही शिकविणारे असल्याचेही ते म्हणाले.