कामगार याेजना कागदावर स्वाक्षरी करा म्हणत, लाभार्थ्याने महिला सरपंचाला काेंडले!
By राजकुमार जोंधळे | Published: August 9, 2024 08:32 PM2024-08-09T20:32:37+5:302024-08-09T20:33:02+5:30
चाकूर पाेलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी दाखल...
लातूर : कामगार याेजनेच्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातच महिला सरपंचाला काेंडल्याची घटना शिवणखेड (ता. चाकूर) येथे घडली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात एकाविराेधात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, शिवणखेड (बु.) येथील सरपंच बायणाबाई नामदेव साळुंके यांची दहा महिन्यांपूर्वी सरपंचपदी निवड झाली. गावातील सूरज साके हा ७ ऑगस्ट राेजी ग्रामपंचायत कार्यालयात कामाचा अर्ज घेऊन आला. त्यावेळी सरपंच साळुंके यांनी जे काय काम असेल ते मी करते, असे म्हटल्यानंतरही त्याने कामगार याेजनेचा अर्ज देतानाचे छायाचित्र काढले. त्यानंतर ताे तेथून निघून गेला. ८ ऑगस्ट राेजी सकाळी संबंधित अर्जाप्रकरणी महिला सरपंच गावातील पाण्याच्या टाकीकडे कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या.
सूरज साके यांनी त्यांना रस्त्यात भेटून तू कामगार योजनेच्या कागदावर स्वाक्षरी कर असे म्हणून रस्त्यातच अडवले. त्यावेळी सरपंचांनी तुम्ही काल दिलेल्या अर्जाच्या प्रकरणात मी पाहणी करण्यासाठी आले आहे. तुम्हाला कामगार योजनेच्या कागदावर स्वाक्षरी हवी असेल, तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात या, मी स्वाक्षरी करते असे सांगितले. त्यावेळी सूरज साके याने ‘तू जर माझ्या कागदावर आताच स्वाक्षरी नाही केली तर मी तुझ्या हातातील शिक्के ओढून घेऊन, मी स्वत: स्वाक्षरी करेन, असे बोलत निघून गेला. त्यावेळी महिला सरपंच साेळुंके ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कर्तव्य बजावत हाेत्या. यावेळी सूरज साके हा हातात कुलूप घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आला. काही कळायच्या आत त्याने ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले.
यावेळी सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून कुलूप का लावले? असा जाब विचारला. तुला नीट सांगितले हाेते, माझ्या कागदांवर स्वाक्षरी कर, तू माझे ऐकले नाहीस, तू आता मध्येच बस... म्हणत तो बाहेरून कुलूप लावून निघून गेला. महिला सरपंचाला जवळपास तासभर कार्यालयातच काेंडून ठेवले. याची माहिती सरपंच बायणाबाई साळुंके यांनी फाेनवरून चाकूर पाेलिसांना दिली. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढून तो पसार झाला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सूरज बळीराम साके याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी करीत आहेत.