उदगीर रेल्वे स्थानकातून बंगलोरकडे रेशीम कोष रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:20 AM2021-09-25T04:20:00+5:302021-09-25T04:20:00+5:30
जिल्ह्यात रेशीम शेतीचे प्रमाण वाढत आहे. या भागातील शेतकरी रेशीम शेतीकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यास शासनाचे अनुदानही मिळते. ...
जिल्ह्यात रेशीम शेतीचे प्रमाण वाढत आहे. या भागातील शेतकरी रेशीम शेतीकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यास शासनाचे अनुदानही मिळते. मात्र, रेशीम कोषाला या परिसरात योग्य भाव मिळत नाही. भारतात कोलकाता, ढाका व बंगलोर येथे रेशीम मालाची मुख्य बाजारपेठ आहे. जिल्ह्याच्या लातूर रोड व उदगीरमधून बंगलोरसाठी दोन रेल्वे असून, दोन्ही एक्स्प्रेस असल्यामुळे मालवाहतूक होत नव्हती. ही खंत रेशीम उत्पादकांनी उदगीर रेल्वे संघर्ष समितीपुढे व्यक्त केली होती. त्याची दखल घेत संघर्ष समितीने दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून रेशीम कोष बुकिंग व्यवस्था करण्याची मागणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यास त्वरित मंजुरी दिली.
बुधवारी जिल्ह्यातील शेतकरी इस्माईल पाशा यांचे १३ पोते रेशीम कोष उदगीरहून बंगलोरसाठी बुकिंग करून रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वेचे वाणिज्य अधिकारी संतोष चिगळे, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते.