लातुरात मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या बांधल्या रेशीमगाठी
By हरी मोकाशे | Published: January 6, 2024 08:30 PM2024-01-06T20:30:54+5:302024-01-06T20:31:27+5:30
बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा
लातूर : आई- वडिलांच्या मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या रेशीमगाठी बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानने बांधल्या. गेली काही वर्षे येथे राहून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या या लेकी सासरी जाताना एका डोळ्यात विरहाचे तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. वऱ्हाडी मंडळींचेही डोळे पाणवले होते.
औसा तालुक्यातील बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ४२ वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या केंद्रात समाजातील उपेक्षित व्यक्तीस स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य केेले जाते. एक- दीड वर्षापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या एका अनाथ मुलीचे पालकत्व महिला व बालकल्याण विभागाकडून प्रतिष्ठानने घेतले होते. तिला शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. तसेच काही वर्षांपासून येथे दाखल असलेली अनाथ मूकबधीर त्याचबरोबर आई- वडिलांचे छत्र हरवलेली एकजण स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेत होती.
या तिन्ही मुलींच्या विवाहासाठी संस्थेच्या वतीने उपवर शोधण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्यास यश आले आणि उपवरांच्या कुटुंबियांशी भेटीगाठी झाली. त्यांच्या सहमतीने शनिवारी दुपारी तिन्ही वधू- वरांच्या विधीवत पध्दतीने रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, बी.ए. मैंदर्गी, प्राचार्या विना कोपकर, दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमुख हरिश्चंद्र सुडे, कमलाकर सावंत, रविचंद्र वंजारे, वैशाली राठोड, शिवशंकर बरबडे आदींनी परिश्रम घेतले.
आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल...
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अनाथांना स्वयंरोजगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच लोकसहभागाविना परंपरेनुसार विवाह लावण्यात येतो. आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल झाले आहे. ते आनंदाने आपला संसार करीत आहेत.
पुनर्वसनाचा प्रयत्न...
समाजातील वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी राहतात. शासनाकडून अल्पवयीन अनाथ बालकांना आधार दिला जातो. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
- हरिश्चंद्र सुडे.