अहमदपुरात ११ जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा; ४५ जणांविराेधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: April 12, 2023 06:11 PM2023-04-12T18:11:31+5:302023-04-12T18:11:45+5:30
अवैध व्यवसायावर पाेलिस पथकाने अचानक छापेमारी केली.
लातूर : अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ११ ठिकाणी एकाच वेळी पाेलिस पथकाने छापा मारला असून, यावेळी २ लाख ७ लाख ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांन्वये स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर जुगारासह इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मिळाली. या माहितीवरून त्यांनी सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर, अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ११ ठिकाणच्या जुगारावर, अवैध व्यवसायावर पाेलिस पथकाने अचानक छापेमारी केली. यावेळी जुगाराच्या साहित्यासह २ लाख ७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी काही व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी गाेलाकारात स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत असताना आढळून आल्या. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात एकूण ४५ जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात जुगाऱ्यांनी केले पलायन...
पाेलिसांनी मटका-जुगारावर छापा मारला असता, सात जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. त्याचा पाेलिस पथक शाेध घेत असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.