ऑटोत प्रवासी म्हणून बसवायचे; जबर मारहाण करून ते लुटायचे!
By राजकुमार जोंधळे | Published: June 15, 2023 10:06 AM2023-06-15T10:06:36+5:302023-06-15T10:07:06+5:30
तिघांना अटक: दोन ऑटो, ११ मोबाइल जप्त.
राजकुमार जोंधळे, लातूर: ऑटोमध्ये प्रवासी बसवून त्यांना मारहाण करत लुटणाऱ्या तिघा सराईत लुटारूंना लातूर पोलिसांनी बुधवारी दोन ऑटोसह अटक केली. त्यांच्याकडून ११ मोबाईलसह ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात गुन्ह्याचा उलगडा केला.
पोलिसांनी सांगितले, ऑटोमध्ये प्रवासी म्हणून बसवून घेणे आणि त्यांना धावत्या ऑटोमध्ये मारहाण करणे, त्यांच्याकडील पैसे, मोबाईल जबरदस्तीने काढून घेत ढकलून देणे, अशा पद्धतीने लुटालूट करणाऱ्या सराईत टोळीतील तोया उर्फ तोहीद उर्फ सोहेल अकबर पठाण, (वय २०, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर), महेश उर्फ बाळू योगीराज विभुते (वय २१, रा. कव्हा, ह. मु. गुमास्ता कॉलनी, कव्हारोड, लातूर) आणि मोहित विजय भडके (वय २३, रा. बारानंबर पाटी, श्याम नगर, लातूर) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना विश्वासात घेत चौकशी केली असता, त्यांनी ऑटोत प्रवाशांना बसवून, एकांतात ऑटो थांबवून मारहाण करून लुटल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून लुटलेले ११ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले दोन ऑटो आणि रोख सात हजार असा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक झाडाझडती घेत पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी सात गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हजबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के ,जमीर शेख ,राजेश कंचे ,संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घातले तपासामध्ये लक्ष...
लातूर शहरात काही दिवसापासून रात्रीच्यावेळी ऑटोत प्रवासी म्हणून बसून घेऊन, ऑटो चालक प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल काढून घेत लुटत असल्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान, याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी माहिती घेत हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
काही दिवसांपासून पोलिस पथक होते लुटारूंच्या मागावर...
स्थागुशाचे पोनि. गजानन भातलवंडे यांच्या पथकाने गुन्हेगाराचा शोध सुरु केला. बुधवारी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाळत ठेवली. दोन ऑटोचालक त्यांच्याकडील विविध कंपनीचे मोबाईल कमी पैशात विकत आहेत. ते रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाक्याकडे जाणाऱ्या रिंगरोडवर थांबले आहेत. अशी टीप मिळाल्याने तातडीने पोलिस पथकाने रस्त्यालागत ऑटोसह थांबलेल्या तिघांच्याही मुसक्या असवळल्या.
पाच पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहेत सात गुन्हे...
लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. यात शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण ठाण्यात सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.