एकाच मोपेडवरून सहा जणांचा प्रवास आला अंगलट; आडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Published: March 4, 2023 09:59 PM2023-03-04T21:59:31+5:302023-03-04T22:00:13+5:30
दाेघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
लातूर : कळंबच्या दिशेने एकाच दुचाकीवरून चक्क सहा जण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, याच दुचाकीला कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरचीची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पाेने जाेराने उडवले. या भीषण अपघातात दुचाकीवरील सहा जण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जागीच ठार झाले असून, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास लातूर-कळंब महामार्गावरील जाेडजवळानजीक घडला.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील नाईकनगर, जवळगा तांडा येथील विलास प्रकाश आडे (वय ४०), आकश प्रकाश आडे (वय ३५), शंकर विकास आडे (वय ४), वैशाली विकास आडे (वय ६), शशिकला प्रकाश आडे (वय ५५) आणि जान्वी विकास आडे (वय १२) असे सहा जण एकाच दुचाकीवरून (एमएच २४ वाय ४३९९) लातूर येथून कळंबच्या दिशेने प्रवास करत हाेते. रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी जाेडजवळा गावानजीक आली. दरम्यान, कळंब येथून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव टेम्पाेने (एमएच २५ एजे ५०५३) दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात सहा जण दुचाकीवरून उडून रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीवरील चार जण जागीच ठार तर दाेघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विलास प्रकाश आडे (वय ४०), आकश प्रकाश आडे (वय ३५), शंकर विकास आडे (वय ४), वैशाली विकास आडे (वय ६) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये शशिकला प्रकाश आडे आणि जान्वी विकास आडे हे गंभीर जखमी झाले. असे गातेगाव पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक घारगे यांनी सांगितले.
नाईकनगर तांड्यावर झाले अंत्यसंस्कार...
आडे कुटुंबीयातील चाैघांवर शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काळाने घाला घातला. या भीषण अपघाताने एका क्षणात चार जणांचा बळी घेतला. रात्रीच्या काळाेखात झालेल्या अपघाताने नेमके काय झाले आहे, हेच काही वेळ समजले नाही. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी याची माहिती पाेलिसांना दिली. घटनास्थळी गावकरीही धावून आले. या घटनेने नाईकनगर तांड्यावर शाेककळा पसरली असून, मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
६ जणांचा प्रवास;व्हिडीओ व्हायरल..
.लातूर-कळंब महामार्गावरून एकाच दुचाकीवरून सहा जण प्रवास करत असल्याचे अन्य वाहनधारकांना कुतूहल वाटले आणि त्यांनी व्हिडीओ केला. हाच व्हिडीओ अपघातानंतर साेशल मीडियात व्हायरल झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघे माेठे आणि तीन लहान मुले प्रवास करताना व्हिडीओत दिसून येत आहे. हाच प्रवास त्यांच्या जिवावर बेतला आहे.