केळगावनजीक टेम्पो आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:36 PM2021-11-21T16:36:48+5:302021-11-21T16:37:16+5:30
Accident in Latur: निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
लातूर - निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लातूर - जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो क्र. एमएच १४ एएच ६२२३ व व जीप क्र. एमएच १४ सीसी ८३३८ चा समोरासमोर अपघात झाला. टेम्पो हा सोयाबीनची गुळी घेऊन केळगावच्या दिशेने जात होता. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे वर्हाड घेऊन निघाली होती. यात जीपचा चुराडा झाला आहे. यामध्ये जीपमधील पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ च्या रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. सर्व जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. निटुर पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे व पो. कॉ. हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय...
मागील काही दिवसांपासून लातूर ते जहीराबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक व अनेक गावावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित महामार्ग प्रशासनाने लवकरात गाव तिथे रस्ता दुभाजक करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले ग्रामस्थ...
केळगावपाटीनजीक अपघात झाल्याची माहिती मिळताच गावातील मदार माकणे, जहांगीर शेख, उस्मान पठाण, मुरली परळे, माजी मुख्याध्यापक स्वामी, कलांडी, बुजरूकवाडी शिवारातील काही नागरिक, शेतकरी तात्काळ मदतीसाठी धावले. रूग्णवाहिका येताच जखमींना मदतीचा हात दिला.