शॉर्टसर्किटमुळे सहा दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 07:07 PM2020-10-04T19:07:34+5:302020-10-04T19:08:19+5:30
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील गंगाखेड रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या दुकानांना शाॅर्टसर्किटमुळे शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीमध्ये एकूण ६ दुकाने जळून खाक झाली
लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील गंगाखेड रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या दुकानांना शाॅर्टसर्किटमुळे शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीमध्ये एकूण ६ दुकाने जळून खाक झाली असून जवळपास ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गोपीनाथ कांबळे, व्यंकटेश जोशी, रफिक शेख, अजिम मणियार, खलिल पठाण, खलिल बागवान यांची ही दुकाने होती. तर अरबाज शेख यांचे पान मटेरियल शॉपही या आगीत जळून खाक झाले. जवळपास तीन तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी सरपंच किशोर मुंडे यांच्यासह महसूल, महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
लॉकडाऊनमध्ये गेले काही महिने दुकने बंद होती. परिणामी, बँकांचे कर्ज डोक्यावर आहे. यासाठी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खलिल पठाण यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी केली.