तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी
By हरी मोकाशे | Published: April 30, 2023 07:07 PM2023-04-30T19:07:54+5:302023-04-30T19:09:25+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया.
हरी मोकाशे, लातूर : एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाची मूत्राशयाची नळी दीर्घ रोगामुळे पूर्णपणे खराब होऊन बंद पडली होती. तेव्हा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही नळी तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बनविण्याचा निर्णय घेत पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया शनिवारी केली आहे.
बीड येथील एका ५६ वर्षीय पुरुषाची मूत्राशयाची नळी बीएक्सओ (बलनायटिस झिरोटिका ऑब्लिटरनेस) या दीर्घरीत्या झालेल्या रोगामुळे पूर्णपणे खराब होऊन बंद पडली होती. त्यांना गावाकडील खासगी रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात मूत्राशयाच्या पिशवीत पाइप टाकून लघुशंकेचा मार्ग मोकळा करून देत लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे हा रुग्ण येथे दाखल झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागातील तज्ज्ञ डॉ. कासिम अत्तार यांनी रुग्णाचा इतिहास जाणून आवश्यक त्या तपासण्या करून घेण्यास सांगितले. तेव्हा मूत्राशयाची संपूर्ण निकामी असल्याचे आढळले. त्याची माहिती नातेवाईकांना देऊन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले. तसेच रुग्णाची मूत्राशयाची संपूर्ण नळीच नवीन स्वरूपात तोंडातील त्वचा काढून कृत्रिमरीत्या बनविण्यात येईल, असेही डॉ. कासिम अत्तार यांनी सांगितले. तेव्हा नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर रुग्णाच्या तोंडातील त्वचा काढून घेऊन मूत्राशयाची नवीन कृत्रिम नळी बनवून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
शस्त्रक्रियेसाठी यांनी केली मदत...
या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गंगाधर अनमोड, पथकप्रमुख डॉ. गणेश स्वामी, डॉ. शोभा निसाले, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. चंद्रशेखर हळणीकर, डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. संदीप जाधव, डॉ. निखिल काळे, डॉ. नितीन बरडे, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. किरण तोडकरी, डॉ. जोशी यांचे सहकार्य लाभले. त्यांना परिचारिका गोडबोले, समाजसेवा अधीक्षक सुरेंद्र सूर्यवंशी आदींनी मदत केली. ही शस्त्रक्रिया महात्मा जाेतिबा फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय समन्वयक डॉ. मेघराज चावडा यांच्या अधिपत्याखाली मोफत झाली.
अवघड जागेस दुखापत झाल्यास तत्काळ उपचार घ्या...
लघुशंकेच्या अवघड जागेवर दीर्घकाळ इन्फेक्शन, मार लागून दीर्घकाळ दुखापत राहिल्यास अथवा इतर रोगांमुळे मूत्राशयाची पूर्ण नळीच खराब होऊन लघवी बंद होऊ शकते. त्यामुळे तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार घ्यावेत. - डॉ. कासिम अत्तार, युरो सर्जन.
अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोफत...
अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. किडनी, प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया, मूत्राशयाच्या पिशवीच्या समस्या व शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया येथे मोफत यशस्वीपणे पार पाडल्या जातात. या सोयी- सुविधांचा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ जिल्ह्यातील परिसरातील रुग्णांना होईल. - डॉ. समीर जोशी, अधिष्ठाता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"