उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली
By संदीप शिंदे | Published: December 28, 2023 03:45 PM2023-12-28T15:45:02+5:302023-12-28T15:45:21+5:30
उदगीर शहरात शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
उदगीर : येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर क्रीडा संकुल उभा करण्याचे काम सुरू असल्याची चर्चा असून, काम सुरू होण्याच्या अगोदरच मैदानाच्या कडेला असलेली अनेक वर्षांची वड, चिंच , लिंब अशा अनेक वृक्षांची कत्तल बुधवारी करण्यात आली. या वृक्षांचा नागरिकांना दिलासा असून, वृक्षतोड करू नये, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
उदगीर शहरात शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या मैदानात असलेल्या अनेक वृक्षांची कत्तल ठेकेदाराकडून करण्यात आली होती. त्याठिकाणी वड, पिंपळ, लिंब अशी शेकडो वर्षांची झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीच्या विरोधात शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आंदोलन केले होते. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पाहणी करून अहवाल देण्याचे कबूल केले होते. मात्र, याबाबतचा अहवाल अद्यापही आलेला नाही. केवळ संबंधित ठेकेदाराने एका वटवृक्षाचे पुनर्रोपण केले. ही घटना ताजी असतानाच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या कडेला व बांधकामाला कुठलीही अडचण न ठरणाऱ्या अनेक झाडांची कत्तल बुधवारी करण्यात आली. ही वृक्षतोड रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. या ठिकाणी काही पर्यावरणप्रेमी चौकशीसाठी गेले असता संबंधित ठेकेदाराने त्यांना उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या अगदी कडेला अनेक वर्षांपासून ही झाडे सावली देण्याचे काम करीत आहेत. झाडे तोडली त्यासमोर शासकीय रुग्णालय असल्यामुळे येथे उपचारासाठी आलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी हेच हक्काचे मैदान व सावली देण्यासाठी याच झाडाचा आधार होता. परंतु, ही झाडे तोडल्यामुळे आता हा परिसर भकास दिसत असून, पर्यावरणप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
४१ वृक्ष तोडण्याची परवानगी...
जिल्हा परिषद मैदानाच्या ठिकाणी क्रीडा संकुल निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे झाडे तोडण्यात येणार आहेत. एकूण ४१ वृक्षांची तोड करण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी वड, चिंच, लिंब ही झाडे जुनी असली तरी तोडली जाणार आहेत, असे उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी सांगितले.