मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी
By राजकुमार जोंधळे | Published: September 1, 2022 05:26 PM2022-09-01T17:26:38+5:302022-09-01T17:27:36+5:30
पोलिसांच्या कार्यावाईत दुचाकीसह एकास अटक तर दुसरा निसटला
लातूर : गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरासह जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री करणाऱ्या निलंगा येथील तरुणाला पाठलाग करुन नाना-नानी पार्क परिसरात गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. तर दुसरा साथीदार पथकाच्या तावडीतून निसटला आहे. दरम्यान, त्याच्याकडून अवैध दारुसह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर येथील पथकाला लातूर शहरासह जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची चोरट्या मार्गाने तस्करी केली जात असल्याची खबऱ्याकडून माहीती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या 'टीप'नुसार एक दुचाकी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना - नानी पार्क दरम्यानच्या मार्गावर जात असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने दुचाकीचा (एम.एच. २४ ए.एल. ११३६ ) पाठलाग केला. नाना-नानी पार्कनजीक शिवाजी कुमार कांबळे (वय २७ रा. निलंगा) याला अटक करण्यात आली. तर सोबतचा साथीदार हा पथकाला गुंगारा देत पळून गेला. अटकेत असलेल्याकडून गोवा बनवटीची ५४ लिटर दारू (किंमत ७९ हजार ९२० रुपये ) आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. याबाबत शिवाजी कुमार कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजित देशमुख, दुययम निरीक्षक आर. एम. बांगर, एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, दिनेश सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे यांच्या पथकाने गुरुवारी केली.
अन दारुसाठी 'मोबाइल' सेवा...
कोणत्याही कंपनीची आणि हातभट्टीसह देशी दारुची मागणी करण्यासाठी केवळ एक कॉल करा दारु तस्करी करणाऱ्या व्यक्तीला...मग दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ज्या ठिकाणी थांबला आहात त्या ठिकाणी हे पार्सल आणून दिले जाते. गोवा बनवटीसह देशी दारूला मोठी मागणी असल्याचे समोर आता आले आहे.