चाेरट्या मार्गाने अवैध दारुची वाहतूक; ३ वाहनांसह देशी-विदेशी दारु जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: December 13, 2022 07:53 PM2022-12-13T19:53:25+5:302022-12-13T19:53:40+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरासह जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात चाेरट्या मार्गाने वाहनातून देशी-विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्यांना लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पाेलिस पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून देशी-विदेशी दारुचा साठा माेठ्या प्रमाणावर जप्त केला आहे. या कारवाईत तीन वाहने आणि दारु साठा असा जवळपास १८ लाखांच्या घरात मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर आणि निलंगा तालुक्यातील अंबुलगा परिसरातून चाेरट्या मार्गाने अवैध दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पथकाने चारचाकी वाहन अडवून झाडाझडती घेतली. यात अवैध दारुची वाहतूक करताना १ हजार ८० लिटर देशी दारुचा साठा हाती लागला. यावेळी तिघांना पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अंबुलगा येथील उमेश अशाेक हाेरे याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी दाेन चारचाकी वाहनासह दारु साठा असा एकूण १४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लातुरात चारचाकी वाहनातून विदेशी दारुसह एका व्यक्तीला ताब्यात घेतले. यावेळी ३ लाख ५८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत तीन चारचाकी वाहनांसह देशी-विदेशी दारु साठा असा जवळपास १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत, निरीक्षक आर.एम. बांगर, आर.एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, हणमंत मुंडे, संताेष केंद्रे, सहायक पाेलिस निरीक्षक गाेपाळ शिंदे, पाेलिस उपनिरीक्षक धनराज हरणे, पाेलिस नाईक शिवाजी जेवळे, बळीराम केंद्रे यांच्या पथकाने केली.