नागपंचमीला सापाला पुजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:59+5:302021-08-13T04:23:59+5:30

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत ...

The snake is worshiped on Nagpanchami; Then why is he killed the other day? | नागपंचमीला सापाला पुजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

नागपंचमीला सापाला पुजले जाते; मग इतर दिवशी का मारले जाते?

Next

लातूर : साप हा शब्द उच्चारताच अंगाचा थरकाप होतो. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे महत्त्व आहे. त्यामुळे निसर्गाच्या साखळीचा समताेल राखण्यासाठी सापांना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यात चार विषारी, दोन निमविषारी तर दहा बिनविषारी साप आढळतात. सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे साप दिसताच त्याला मारले जाते. मात्र, साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे खाद्य आहेत. त्यामुळे अन्नसाखळीचा समतोल राखण्यास मदत होते. जिल्ह्यातील सर्पमित्रही त्यांना फोन येताच घटनास्थळी जाऊन सापांना पकडतात आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. त्यामुळे सापाबद्दल समाजात असणारी भीती दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत सर्पमित्रांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार...

विषारी साप... जिल्ह्यात नाग, मण्यार, घोणस-परड, फुरसे हे विषारी साप तर हरणटोळ, मांजऱ्या हे निमविषारी साप आढळतात. तसेच वॉल सिंधचा मण्यार, पोवळा हे विषारी जातीचे दुर्मीळ सापही आढळतात.

बिनविषारी - अजगर, पानबिवड, मांडूळ, धामण, पुकरी, डुरक्या घोणस, काळतोंड्या, कवड्या, गवत्या, तस्कर, वाळा आदी बिनविषारी साप तर दुर्मीळ दिसणारे गजरा साप, स्टाऊटचा रेती सर्प जिल्ह्यात काही ठिकाणी आढळतात. हे सर्व साप बिनविषारी आहेत.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र...

सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उदरांचा नायनाट करण्यासह महत्त्वाची भूमिका साप निभावतात. वनसंपदा असलेल्या आपल्या जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. दरम्यान, निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना न मारता निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याची गरज आहे.

सर्पमित्र काय म्हणतात...

जिल्ह्यात प्रामुख्याने चार विषारी तर दहा बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळतात. साप दिसताच सर्पमित्राला संपर्क करावा. सापांना वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- भीमाशंकर गाढवे, सर्पमित्र

साप आढळला तर...

शेतात किंवा घराच्या परिसरात साप आढळल्यास तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा किंवा सापाबद्दल माहिती असल्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून द्यावे.

ग्रामीण तसेच शहरी भागात घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने त्याबाबत जनजागृतीची गरज आहे.

साप चावल्यास घरगुती उपचार न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. नागरिकांनी सापाबाबत भीती बाळगू नये.

Web Title: The snake is worshiped on Nagpanchami; Then why is he killed the other day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.