समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला!
By हरी मोकाशे | Published: February 9, 2024 06:23 PM2024-02-09T18:23:56+5:302024-02-09T18:28:01+5:30
जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येतात.
लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनुदानावर मिरची कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी अशा विविध योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली होती. मात्र, छाननीत प्रस्ताव ५० टक्के अपात्र ठरल्याने ८०२ ऐवजी ६४३ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे समाजकल्याण आले द्यायला अन् लाभार्थी मिळेनात घ्यायला अशी अवस्था झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातून ८९५ लाभार्थ्यांच्या निवडीकरिता प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले. परंतु, छाननीत बहुतांश प्रस्ताव अपात्र ठरले आहेत.
मागासवर्गीयांसाठीच्या याेजनेचे नाव - निवडावयाची संख्या - निवडलेले लाभार्थी
महिलांना मिरची कांडप यंत्र - १०० - १००
महिलांना मिनी पिठाची गिरणी - १२९ - ११६
महिलांना पिकोफॉल यंत्र - २०५ - १६५
शेळी पालनासाठी अर्थसहाय्य - १६६ - १६६
पाच एचपीचा पाणबुडी पंप - ९० - ६३
बॅण्ड वाजंत्री साहित्य - १२ - १२
बचत गटांना अर्थसहाय्य - १९ - १९
एकूण - ८०२ - ६४३
जिल्ह्यातील ६४३ लाभार्थ्यांची निवड...
२० टक्के सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या सात योजनांसाठी ८०२ लाभार्थी निवडायचे होते. त्याकरिता एकूण १ हजार ८९६ प्रस्ताव दाखल झाले होते. छाननीत जवळपास ४५ टक्के प्रस्ताव अपात्र ठरले. त्यामुळे ६४३ लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
चिठ्ठ्या टाकून झाली निवड...
जिल्हा परिषदेतील समाजकल्याणच्या समिती सभागृहात पंचायत समितीचे अधिकारी आणि प्रस्तावधारकांच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकून लाभार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा परिषदेच्या संकतेस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तसेच पंचायत समितीच्या नोटीस फलकावर डकविण्यात येणार आहेत, असे समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितले.
साहित्य खरेदी करा अन् पावत्या सादर करा...
योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्वत: साहित्य खरेदी करावे आणि पावती समाजकल्याण विभागाकडे सादर करावी. तपासणीनंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे.
- संतोषकुमार नाईकवाडी, समाजकल्याण अधिकारी.
३ कोटींचा निधी उपलब्ध...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजकल्याण विभागाअंतर्गतच्या मागास प्रवर्गातील कुटुंबांसाठी आणि दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी ३ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
१२३ दिव्यांगांना लॉटरी...
दिव्यांगांसाठी निधीतून लाभाच्या योजनेसाठी १२३ जणांची निवड झाली आहे. चार योजनांसाठी एकूण ५४६ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील ४१० अपात्र ठरले.