कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!
By संदीप शिंदे | Published: May 4, 2023 05:24 PM2023-05-04T17:24:34+5:302023-05-04T17:25:16+5:30
गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लातूर : जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी असली, तरी पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ६६ गाव-वाड्यांनी ६९ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यातील ७ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला जातो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. मात्र, एप्रिलच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी, गाव-वाड्यांवर टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ५२ गावे व १४ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्याने संबंधित ग्रामपंचायतीने ६९ प्रस्ताव पंचायत समितीकडे अधिग्रहणासाठी दाखल केले आहेत. त्यातील ३९ गावांचे ४१ प्रस्ताव तहसीलस्तरावर असून, उपविभागीय अधिकारी यांनी ५ गावे व दोन वाड्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या सात गावांना आता अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना गावात पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा असून, २८ गाव-वाड्यांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर केले आहेत. यातील पाच गावांत स्वत: उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी करून अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या तालुक्यांतील गावांत टंचाईच्या झळा...
लातूर तालुक्यातील ५ गावे, औसा १४, निलंगा ८, अहमदपूर २८, चाकूर ५, उदगीर ३, तर जळकोट तालुक्यातील ६ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे. रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि देवणी या तालुक्यांतून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नसल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
जून ते ऑगस्टसाठी विशेष आराखडा...
भारतीय हवामान विभागाने ‘अल् निनो’च्या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होऊ शकते. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जून ते ऑगस्ट महिन्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सव्वाचार कोटी रुपयांचा आराखडा या तीन महिन्यांसाठी तयार करण्यात आला असून, त्यास मंजुरीही देण्यात आली आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकर नाही...
जिल्ह्यात मागील वर्षीच्या उन्हाळ्यात केवळ अधिग्रहणाची मागणी होती. त्यामुळे टँकरची आवश्यकता भासली नाही. यंदाही आतापर्यंत केवळ अधिग्रहणाचे प्रस्ताव आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना काही प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी अधिग्रहण प्रस्तावांत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही टँकरचे प्रस्ताव येणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.