लातुरात सोयाबीनचा दर पोहोचला ३१५० रुपयांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:39 AM2018-10-17T11:39:44+5:302018-10-17T11:40:29+5:30
बाजारगप्पा : लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली.
- हरी मोकाशे (लातूर)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण आनंदात साजरा करण्यासाठी शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी करण्यात मग्न आहेत़ त्यामुळे लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली.
सध्या २० हजार ४९४ क्विं़ दररोज आवक होत असून, सर्वसाधारण दर ३ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे़ हा दर हमीभावापेक्षा कमी असला तरी शासनाचे खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि हातात कधी पैसे मिळणार? यापेक्षा क्विं़मागे २५० रुपयांचा तोटा झाला तरी आनंदाच्या सणावर विरजण नको, अशा मानसिकतेतून सोयाबीनची विक्री करीत आहेत़
लातूर जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक सोयाबीन होय़ यंदा ऐन शेंगा भरण्याचा कालावधीत पावसाचा ताण आणि त्यानंतर दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचा उतारा निम्म्याने घटला आहे़ त्यातच काढणीसाठी मजुरांचा खर्च वाढला आहे़ दसरा, दीपावलीपूर्वी शेतीमालाचे पैसे हाती पडावे, म्हणून शेतकरी धडपड करीत आहे़ त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनची आवक दुप्पट झाला. कमाल दर ३,२३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़
पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेत मूग आणि उडदाची आवक वाढली होती़; परंतु या आठवड्यात मुगाची आवक एक हजार क्विं़ने घटून दीड हजार क्विं़पर्यंत होत आहे़ आवक कमी झाली की दरात वाढ होते, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात जवळपास २०० रुपयांनी वाढ होऊन तो ५ हजार ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ तसेच उडदाची आवक निम्म्याने घटली असून १ हजार ७०० क्विं़पर्यंत होत आहे़ सर्वसाधारण दर ४२५० रुपये असा स्थिर असला तरी कमाल दरात ५० रुपयांनी वाढ झाली.
दरम्यान, तुरीची साडेपाचशे क्विं़पर्यंतच आवक स्थिर असून, दरात ५० रुपयांची घट झाली असून ३ हजार ६०० रुपये प्रति क्विं़ भाव मिळत आहे़ सध्या बाजारपेठेत गव्हास सर्वसाधारण दर २०००, हायब्रीड ज्वारी- १२००, रबी ज्वारी- १९५०, पिवळी ज्वारी- २५००, हरभरा- ३९६०, करडई- ३५००, तीळ- १०५००, धन्यास ४००० रुपये प्रति क्विं़ दर मिळत आहे़ गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये उडीद, मुगाची खरेदी सुरू झाली होती़ त्यामुळे यंदाही आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्षात खरेदीस सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु सध्या या शेतमालाची आॅनलाईन नोंदणीचे कामच सुुरू आहे़
आतापर्यंत जिल्ह्यातील ८ केंद्रांवर जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली.ऐन दीपावलीच्या तोंडावर खरेदी सुरू झाल्यास शेतमालाचे पैसे सण झाल्यानंतर मिळतील़ त्यापेक्षा मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करीत आहेत़ गत गुरुवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देऊन बाजार समित्यांत हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणारे व्यापारी, अडत्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. वास्तविक, आतापर्यंत कुठल्याही शेतमालाला हमीभाव मिळाला नाही़ सध्याही दर घसरलेलेच आहेत़ त्यामुळे बाजार समित्या किती अडते, खरेदीदारांवर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे़.