बोअरच्या पाण्यावर वाढवलेले सोयाबीन पावसाने नासवले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:17 PM2019-11-07T16:17:01+5:302019-11-07T16:17:31+5:30
कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचा फटका
- संदीप अंकलकोटे
चाकूर (जि. लातूर) : दिवाळीपूर्वी कोरडा अन् दिवाळीनंतर ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, तालुक्यातील ४४ हजार ४८० हेक्टर सोयाबीन पाण्यात गेले आहे. मोहनाळच्या एका शेतकऱ्याने १८ एकर सोयाबीन बोअरच्या पाण्यावर वाढविले. मात्र, परतीच्या पावसाने या सोयाबीनची नासाडी झाली असून, पीक पूर्ण कुजले आहे.
चाकूर तालुक्यात ६८ हजार ७५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४४ हजार ४८० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ९ हजार १२४ हेक्टरवर तूर आणि १ हजार १३५ हेक्टरवर अन्य पिके होती. पेरणीनंतर अधूनमधून झालेल्या पावसावर सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जोर धरला अन् होत्याचे नव्हते झाले. आता सारा शिवार पाण्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीवर पाणी फिरले आहे.
मोहनाळ येथील शेतकरी शिवकुमार चांदसुरे यांनी २४ एकरपैकी १८ एकर जमिनीवर सोयाबीन पेरले. बोअरचे पाणी देऊन सोयाबीन वाढविले. पीक बहरले होते. काढणीलाही आले होते. ५४ हजार रुपये देऊन काढणीचे गुत्ते दिले होते. पण अचानक आलेल्या पावसाने १८ एकरचा सोयाबीनचा फड पाण्यात नासला आहे. दरम्यान, चाकूर महसूल मंडळात ५ हजार ६८१, वडवळ नागनाथ १० हजार ६८, नळेगाव ७ हजार ९३६, शेळगाव ६ हजार ४५०, झरी (बु.) ६ हजार ७९९, तर आष्टा महसूल मंडळात ७ हजार ५३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. हे सर्व पीक पाण्यात आहे.