सोयाबीनचा भाव आठवडाभरापासून स्थिर; सर्वसाधारण दर ४७१० रुपये

By हरी मोकाशे | Published: January 17, 2024 07:23 PM2024-01-17T19:23:21+5:302024-01-17T19:23:33+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीत १० क्विंटल आवक

Soyabean price steady since week; General Rate Rs.4710 | सोयाबीनचा भाव आठवडाभरापासून स्थिर; सर्वसाधारण दर ४७१० रुपये

सोयाबीनचा भाव आठवडाभरापासून स्थिर; सर्वसाधारण दर ४७१० रुपये

लातूर : सोयाबीन दरवाढीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी- जास्त होत असली तरी आठवडाभरापासून सर्वसाधारण दर स्थिर आहे. बुधवारी ९ हजार ८९८ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ४ हजार ७१० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे विशेष लक्ष केंद्रित केले. खरीप हंगामाबरोबरच उन्हाळी सोयाबीन पीक घेण्यास सुरुवात केली. गत खरीपात विलंबाने पाऊस झाला. नगदी पीक म्हणून जवळपास साडेचार लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.

सोयाबीनची काढणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आर्थिक गरज भागविण्यासाठी विक्री केली. विशेषत: दीपावली सणापूर्वी सोयाबीनला चांगला भाव होता. सरासरी ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. सण झाल्यानंतर मात्र, दरात घसरण होण्यास सुरुवात झाली.

किमान दरामध्ये अल्पशी वाढ...
तारीख - आवक - कमाल - किमान - साधारण भाव

८ जाने. - ९३८१ - ४८५० - ४५४३ - ४७००
९ रोजी - १२०२२ - ४७१५ - ४४०१ - ४६७०
१० रोजी - ७६३२ - ४८४० - ४६१६ - ४७००
१२ रोजी - १२२१२ - ४७७५ - ४४५० - ४७२०
१३ रोजी - १०३७० - ४८०० - ४४६० - ४७५०
१६ रोजी - ८२२८ - ४७५० - ४५०० - ४७००
१७ रोजी - ९८९८ - ४७७५ - ४५९९ - ४७१०

विदेशात डीओसीला मागणी नाही...
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. यंदा काही देशांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. सध्या विदेशात सोयाबीन डीओसीला मागणी नाही. शिवाय, बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणीही स्थिर आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर आहेत. आगामी काळात फारसे भाव वाढण्याची आशा कमीच आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Soyabean price steady since week; General Rate Rs.4710

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.