लातूरला सोयाबीनचे दर ३१०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:40 AM2018-10-24T11:40:51+5:302018-10-24T11:41:21+5:30
बाजारगप्पा : यंदा सरासरीच्या तुलनेत ६४ टक्के पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ६० टक्के घट झाली़ आहे
- हरी मोकाशे (लातूर)
लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६४ टक्के पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ६० टक्के घट झाली़ परिणामी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅक्टोबरमध्ये होणारी आवक निम्मी झाली़ त्यामुळे सोयाबीनला ३ हजार १०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे़
विजयादशमी अगोदर सोयाबीनची दैनंदिन आवक २८ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती़ कमाल दर ३ हजार ३३० रुपयांपर्यंत होता़ सर्वसाधारण ३ हजार २७०, तर किमान दर ३ हजार २०० रुपये होता; परंतु त्यापूर्वीच्या आठवड्यात सोयाबीनची दररोजची आवक २० हजार ४९४ क्विंटल होती़ कमाल दर ३२३०, सर्वसाधारण दर ३१५०, तर किमान भाव ३०१० रुपये होता़ या दोन आठवड्यांतील सोयाबीनच्या सर्वसाधारण दरात जवळपास १५० रुपयांनी वाढ झाली़
सोमवारी २३ हजार ५१६ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन ३१०० रुपये भाव मिळाला़ हमीभावाच्या तुलनेत हा भाव २९९ रुपयांनी कमी आहे़ सोयाबीनचे उत्पादन घटले आणि बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना सुरू केल्याने दर हा हमीभावाच्या जवळपास मिळत आहे़ या दरात आणखी वाढ होऊ शकते़ त्यामुळे काही शेतकरी थोड्याफार प्रमाणात शेतमाल विक्री करीत आहेत़ बाजारपेठेत सध्या मुगाची आवक घटली असून, ती ९३१ क्विंटलपर्यंत झाली आहे़ त्यामुळे ५११ रुपयांनी दरात वाढ झाली़
उडदाचीही आवक घटली़ ९५२ क्विंटल आवक झाली़ परिणामी कमाल दरात ५३२ रुपये, सर्वसाधारण दरात ४५० रुपयांनी वाढ झाली़ बाजारपेठेत बाजरीला १४४० रुपये, गहू २१००े, हायब्रीड ज्वारी १३५०, रबी ज्वारी २०३०, पिवळी ज्वारी ३४००, हरभरा ४ हजार, करडई ३६००, तीळ ११३०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे़ पिवळ्या ज्वारीच्या दरात ५०० रुपयांनी, तर तिळाच्या दरात १३०० रुपयांनी वाढ झाली़