सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By संदीप शिंदे | Published: January 5, 2024 06:55 PM2024-01-05T18:55:43+5:302024-01-05T18:56:06+5:30

सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती.

Soyabean, turi prices continue to fall; Disappointment on the part of the farmers who waited for the price hike | सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत असून, दरही घसरत आहेत. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याने दरवाढीची आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यातच रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप पिकांना बसला. सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला असलेला ४ हजार ६०० दर मध्यंतरी ५ हजार २५० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची आशा लागली होती. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री न करता त्यांचा माल घरी ठेवला होता. परंतु, मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या घरात घट होत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. बाजारात आवक जरी कमी झाली असली तरी दरदेखील कमी होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली. सुरुवातीला दर ९ हजार ८०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मागील वर्षी तुरीला हंगामाच्या शेवटी उच्चांकी १२ हजार क्विंटलचा दर मिळाला होता. परंतु, एक आठवड्यापासून तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी बाजारात चांगल्या प्रतीच्या तुरीला ८ हजार ५०० प्रति क्विंटलचा दर मिळाला. येणाऱ्या काळात तुरीच्या घरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. दरम्यान, रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यामुळे हरभऱ्याचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यातच हवामानामध्ये बदल होत असल्याने हरभऱ्याची पीक हाती किती येईल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंकाच आहे. नवीन हरभरा ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला.

थेट खरेदी केंद्रामुळे मोंढ्यात आवक कमी...
सोयाबीनचे उत्पादन दर्जेदार झालेले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी ठिकठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, मार्केट यार्डपेक्षा ५० ते ७० रुपयांचा जास्तीचा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांचा माल मार्केट यार्डात विकण्यापेक्षा खासगी कंपनीच्या केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये आवक कमी होत आहे. त्वरित वजन, कुठलीही कपात नाही, खात्यात लगेच रक्कम येत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी कंपनीच्या केंद्राकडे वाढला आहे.

आगामी काळात दरवाढीची अपेक्षा कमी...
बाहेर देशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे स्थानिक बाजारातील सोयाबीनच्या खाद्यतेलास तसेच सोयाबीनच्या पेंडीला मागणी कमी झालेली आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन कारखानदाराकडून सोयाबीनची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरत आहेत. पुढील काळात निवडणुका असल्यामुळे दरवाढीची शक्यता फारच कमी असल्याचे व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.

 

Web Title: Soyabean, turi prices continue to fall; Disappointment on the part of the farmers who waited for the price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.