विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By हरी मोकाशे | Published: January 31, 2024 07:16 PM2024-01-31T19:16:38+5:302024-01-31T19:17:30+5:30

बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरूवात झाल्याने दरात घसरण होण्यास सुरूवात झाली.

Soybean prices continue to fall, hit by production surge abroad; Huge loss to farmers | विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

लातूर : विदेशात अपेक्षेच्या तुलनेत अधिक उत्पादन झाल्याने आणि परदेशातून येणाऱ्या क्रूड तेलाचे दर कमी असल्याने देशातील सोयाबीनच्या दरात घसरगुंडी सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. बुधवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ हजार ९८६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर ४ हजार ५३० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक साडेचार लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे यंदा भावात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. दरम्यान, दसरा-दीपावलीच्या कालावधीत ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहोचला होता. त्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरूवात झाल्याने दरात घसरण होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

आवक १० हजार क्विंटलच्या आत...
दिनांक - आवक - कमाल - किमान - साधारण

१९ जाने. - १३८३३ - ४७८० - ४५०९ - ४७००
२० जाने. - ९५०३ - ४७२९ - ४६०१ - ४६५०
२४ जाने. - १६९७५ - ४६९९ - ४५५० - ४६२०
२५ जाने. - १०६७६ - ४७०१ - ४४९१ - ४६५०
२९ जाने. - ९००१ - ४६५० - ४४०० - ४५६०
३० जाने. - ९१७९ - ४५२० - ४१०० - ४४५०
३१ जाने. - ९९८६ - ४६११ - ४४०५ - ४५३०

अर्जेंटिनामधील अधिक उत्पादनाचा परिणाम...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सोयाबीनचे दर अवलंबून असतात. गेल्यावर्षीपेक्षा यंदा एकूण सोयाबीनच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उत्पादन घटल्याचे दिसत असले तरी अर्जेंटिनामध्ये अधिक उत्पादन आहे. याशिवाय, डीओसीला मागणी कमी झाली आहे. तसेच विदेशातून येणाऱ्या क्रूड तेलाचे दर कमी आहेत. परिणामी, स्थानिक सोयाबीनचे दर आणखीन घसरले आहेत.
- ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

अडचण भागविण्यासाठी शेतमाल तारणकडे धाव...
काही दिवसांपासून सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आर्थिक अडचणीतील सोयाबीन उत्पादकांची तात्पुरती गरज भागविण्यासाठी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत लातूर तालुक्यातील २१० शेतकऱ्यांनी १४ हजार २०५ कट्टे शेतमाल तारण ठेवला. त्यांना बाजार समितीने स्वनिधीतून ३ कोटी २७ लाख ५१ हजार ५६६ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. - जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

Web Title: Soybean prices continue to fall, hit by production surge abroad; Huge loss to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.