२३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:17+5:302021-08-13T04:24:17+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने २३ हजार ७५५ हेक्टरवरील ...

Soybeans on 23,000 hectares in danger | २३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

२३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

Next

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने २३ हजार ७५५ हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २९ हजार ७०० हेक्टर लागवडीयोग्य जमीन आहे. यंदा मृगाच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना सुरुवात झाली होती. त्यानंतर मध्येच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली होती. तद्नंतर आठ दिवसांनी पुन्हा रिमझिम पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरण्या आटोपल्या. २८ हजार ५१० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या.

तालुक्यात यंदा २८ हजार ५१० हेक्टरपैकी सोयाबीनचा पेरा २३ हजार ७५५ हेक्टरवर झाला. एकंदरीत लागवड क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. मागील महिन्यात भिजपाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. फुले लागण्यास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत पावसाची आवश्यकता असताना १५ ते २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे २३ हजार ७५५ हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.

४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके...

तालुक्यात खरिपाच्या पेरण्या २८ हजार ५१० हेक्टरवर झाल्या असून, त्यापैकी २३ हजार ७५५ हेक्टरवर सोयाबीन असून उर्वरित ४ हजार ७५५ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली आहेत. यात ज्वारी ८१, मका ५३, मूग ३२३, उडीद १५६, तूर ४ हजार १३२ हेक्टरवर आहे.

पिके दुपार धरू लागली...

सोयाबीन हे ८० ते ९० दिवसांत येणारे पीक असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला वरवर पावसाची गरज असते. परंतु, १५ ते २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दुपारी कडक उन्हं पडत आहे. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिके दुपार धरू लागली आहेत.

दोन महिन्यांत ५० टक्के पाऊस...

तालुक्याच्या पावसाची सरासरी ७५० मिमी असली तरी तालुक्यात प्रत्येक वर्षी जवळपास १०५० मिमी पाऊस होतो. पावसाळ्यातील दोन महिने उलटले आहेत. तरीही, आतापर्यंत केवळ ५० टक्के म्हणजे ३६२ मिमी पाऊस पडला आहे.

Web Title: Soybeans on 23,000 hectares in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.