सोयाबीन बारा वर्षांच्या नीचांकी दरावर!
By राजकुमार जोंधळे | Updated: January 29, 2025 20:58 IST2025-01-29T20:58:03+5:302025-01-29T20:58:49+5:30
उदगीरात साेयाबीनला ३ हजार ९५० रुपये मिळाला दर

सोयाबीन बारा वर्षांच्या नीचांकी दरावर!
राजकुमार जाेंधळे, लातूर / उदगीर : एकाच दिवसात उदगीर येथील बाजार समितीत माेठ्या प्रमाणावर साेयाबीनची आवक झाली. परिणामी, प्रतिक्विंटल ३ हजार ९५० रुपयांचा दर मिळाला असून, बुधवारचा हा दर बारा वर्षांतील नीचांकी ठरला आहे.
उदगीर येथील मार्केट यार्डात साेयाबीनची आवक माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. प्रतिक्विंटल ३ हजार ९५० रुपयांपर्यंतची घसरण झाली असून, बाजारात विक्रीसाठी साेयाबीन आणलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औराद शहाजानी, औसा मार्केट यार्डात सोयाबीनची आवक माेठी आहे. आवक वाढत असल्याने दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र सोयाबीन पिकावर अवलंबून आहे.
लागवड खर्च वसूल होईना...
साेयाबीनच्या दरात घसरण झाल्याने लागवड खर्चही निघत नाही. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन काेलमडले आहे. तीन वर्षांपासून सोयाबीनला दर मिळत नसल्याने शेती ताेट्यात आहे. विवाहाचे मुहूर्त असून, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. या आठवड्यात साेयाबीनची आवक माेठी असून, दरराेज ७ ते ९ हजार क्विंटल साेयाबीनची आवक हाेत आहे. - अंबादास चिखले, शेतकरी
बाजारात चार हजार क्विंटल तुरीची आवक...
उदगीरच्या बाजारात तुरीची तीन ते चार हजार क्विंटल आवक हाेत आहे. दाेन महिन्यांपूर्वी ११ हजार रुपये क्विंटल तुरीला दर मिळाला हाेता. ताे दिवसेंदिवस घसरत चालला आहे. बुधवारी हा दर सात हजारांवर घसरला आहे. दर चांगला मिळेल, या आशेवर बाजारात तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची काेंडी झाली.