प्रत्येक आजारांच्या निदानासाठी दर आठवड्याला विशेष आरोग्य मोहीम
By हरी मोकाशे | Published: September 1, 2023 05:30 PM2023-09-01T17:30:21+5:302023-09-01T17:31:23+5:30
केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव उपक्रम
लातूर : ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर आरोग्यसेवा मिळावी तसेच त्यांच्यात आजारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दर आठवड्यास विविध आजारासंदर्भात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आयुष्मान भव ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा खेड्यापाड्यातील, तांड्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, आरोग्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी केली जाणार आहे.
आयुष्मान कार्डसाठीच्या लाभार्थ्यांची नोंदणी व कार्ड वितरण, आरोग्य सेवा- सुविधांची आणि आभा कार्डची जनजागृती, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी अथवा रविवारी विशेष आरोग्य शिबीर, तसेच ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
पहिल्यांदा असांसर्गिक आजारांची तपासणी...
आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील विशेष दिनी मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब अशा असांसर्गिक आजारांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यात कुष्ठरोग, क्षयरोग व इतर सांसर्गिक आजारांची, तिसऱ्या आठवड्यामध्ये माता व बालक तसेच पोषण आहार आणि लसीकरणाची माहिती देऊन उपक्रम राबविले जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात कान- नाक- घसा व इतर आरोग्यसेवांसाठी शिबीर होणार आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी २२५ गावांत उपक्रम...
केंद्र शासनाची आयुष्मान भव ही नवी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील २२५ गावांमध्ये आरोग्याच्या जनजागृतीबरोबरच तपासणी शिबीर घेण्यात आले. तसेच औषधोपचार देण्यात आले आहेत.
अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम...
केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम चार महिने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्यासंदर्भात जनजागृती, तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.