तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई; ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: October 21, 2022 07:58 PM2022-10-21T19:58:31+5:302022-10-21T19:58:50+5:30
बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील चार जणांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे.
लातूर : कातपूर रोडवरील बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील चार जणांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ७९ लाख १३ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
पोलिसांनी सांगितले, १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे लातुरातील कातपूर रोडवर व्यावसायिक राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यात दरोडेखोरांनी प्रवेश केला. चाकू, पिस्टल आणि कत्तीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ कोटी ९८ लाखांचा मुद्देमाल घेऊन गेला होता. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकासह पाच पथकांची नियुक्ती केली होती. पथकांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेला पथके रवाना केली होती. दरम्यान, दरोड्यातील गुन्हेगारांचा शोध घेताना खबऱ्याकडून माहिती मिळाली. राजकमल अग्रवाल यांच्या घरातील दरोड्यात संशयीत आरोपी बाभळगाव रोड, लातूर येथे राहत आहे. अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या संशयीताला ताब्यात घेत विचारपूस केली. किशोर घनगाव असे त्याने आपले नाव सांगितले. पुण्यातील हडपर येथे राहणारा टक्कूसिंग कल्याणी आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची कबुली दिली.
हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यासह विविध ठिकाणाहून टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, (वय ५०, रामटेकडी पुणे), किशोर नारायण घनगाव, (वय ३८, रा. पांचपीर नगर, बाभळगाव रोड, लातूर), बल्लूसिंग अमरसिंग टाक, (वय ३०, रा. तीर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना) आणि गणेश कोंडीबा अहिरे (वय ३०, रा. बावची ता. रेणापूर) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख ५० लाख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास ७९ लाख १३ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उर्वरित आरोपींचा आणि मुद्देमालांचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सायबरचे पोलीस निरीक्षक अशोक बेले, सपोनि. राहूल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, भाऊसाहेब खंदारे, सुरज गायकवाड, सावंत, माळवदकर, पोउपनि. महेश गळघट्टे, शैलेश जाधव, सपोउप. रामचंद्र ढगे, अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, रवी गोंदकर, खुर्रम काझी, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे, यशपाल कांबळे, राजेश कंचे, माधव बिलापट्टे, सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, रियाज सौदागर, राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नितीन कटारे, प्रदीप चोपणे, नकुल पाटील, युसुफ शेख, बेल्हाळे, गोविंद भोसले, विनोद चालवाड, मुन्ना पठाण, अर्जुन राजपूत, गोविंद चामे, युवराज गिरी, महेश पारडे, दीनानाथ देवकते, संतोष खांडेकर, संतोष देवडे, प्रदीप स्वामी, गणेश साठे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.