भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला, लातूर-बार्शी मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:15 PM2023-04-11T20:15:58+5:302023-04-11T20:16:25+5:30
हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लातूर : बार्शी मार्गावरून भरधाव जात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आदळला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, भरधाव ट्रक दुभाजकावर अडकल्याने दाेन्ही बाजूंच्या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक बालंबाल बचावले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लातूर शहरातील पाच नंबर चाैकात बार्शी मार्गावरील पेट्रोलपंपासमोरील दुभाजकावर लातूरकडे येणारा भरधाव ट्रक (एमएच २५-एजे ९९३०) अचानक दुभाजकावर चढला. या अपघातामध्ये दुभाजकातील विद्युत पोलचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या रस्त्यावर वाहनांची माेठी वर्दळ हाेती. दुभाजकावर चढलेला ट्रक जाग्यावरच बंद पडल्याने माेठे नुकसान झाले नाही. काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने वाहनधारकांचा एकच गाेंधळ उडाला आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याला मिळाली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले. शिवाय, अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून ताे ताब्यात घेण्याचे काम पाेलिसांकडून सुरू होते.
क्षणात घडला अपघाताचा थरार...
रस्त्यालगत छाेटे-छाेटे हातगाडेवाले, व्यावसायिक आहेत. मात्र, बार्शी मार्गावरून भरधाव लातूर शहराच्या दिशेने आलेला ट्रक काही कळायच्या आत दुभाजकावरील विद्युत पाेल ताेडून दुभाजकावर चढला. हा अपघाताचा थरार पाहून अनेकजण रस्त्याच्या बाजूला पळाले.
काही वाहनधारक बालंबाल बचावले...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकावर चढला. यावेळी लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या काही वाहनधारकांना अचानकपणे ट्रक अंगावर आल्याचा भास झाला. यामध्ये काही वाहनधारक बालंबाल बचावल्याचे घटनास्थळावर भेट दिलेल्या पाेलिसांनी सांगितले.