ब्रह्मदेव बनला एकलव्य ! दोन्ही हातांविना पदस्पर्शाने गाठले यशोशिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 01:33 PM2020-07-30T13:33:16+5:302020-07-30T13:36:31+5:30
माझ्या अपंगत्वामुळे आई-वडिलांना चिंता होती. मात्र, मी जिद्दीने शिकत राहिलो.
- संदीप शिंदे
लातूर : दोन्ही हात नाहीत. मात्र, शिकण्याची मोठी जिद्द बाळगणारा ब्रह्मदेव लष्करे हा दहावीचा विद्यार्थी ‘एकलव्य’ बनला. पदस्पर्शाच्या लेखणीने त्याने यशोशिखर गाठले. मुलगा कसा शिकणार, पुढे कसा जाणार, अशी चिंता असणाऱ्या आई-वडिलांना प्रथमश्रेणीची गुणपत्रिका दाखवून ब्रह्मदेवने चकित केले.
लातूर जवळील सिकंदरपूरच्या वडार वस्तीत लष्करे कुटुंब राहते. आई रामकाबाई, वडील सुरेश हे दोघेही मिळेल ते काम करतात. आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. त्यात ब्रह्मदेव दोन्ही हातांनी अपंग. आईला नेहमी ब्रह्मदेव मोठा व्हावा, असे वाटे. मात्र दोन्ही हात नाहीत, तो शाळा कसा शिकणार हा प्रश्न लष्करे कुटुंबापुढे होता. शिक्षकांनी प्रेरणा दिली. लातूर शहरातील मजगे नगरमधील महाराष्ट्र विद्यालयात त्याने नववी, दहावीचे शिक्षण पूर्ण केले. बोर्ड परीक्षेतही ६५.४६ टक्के गुण मिळवून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.
SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित https://t.co/bE9wcVFujQ
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 30, 2020
पायाने लिहिण्याची कसरत
माझ्या अपंगत्वामुळे आई-वडिलांना चिंता होती. मात्र, मी जिद्दीने शिकत राहिलो. संस्थाचालक माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. मुख्याध्यापक गोविंद शिंदे, सूर्यकांत चव्हाण आणि सर्व शिक्षक माझ्या पाठीशी राहिले. मी अपंग असल्याने शिक्षक चव्हाण हे घरी येऊन शिकवत असत. पायाने लिहिण्याचा सराव ही मोठी कसरत होती. मात्र माझे आई-वडील, शिक्षक, सातवीत असणारा भाऊ अमोल, बहीण पिंकी सगळ्यांचीच मला प्रेरणा मिळाली.
- ब्रह्मदेव लष्करे
#SSCResult2020 ९३ टक्के घेतल्याचे कौतुक कोण करणार ? https://t.co/rLTtzPa6KB
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 30, 2020