SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
By संदीप शिंदे | Updated: May 27, 2024 13:35 IST2024-05-27T13:34:51+5:302024-05-27T13:35:02+5:30
लातूर विभागीय मंडळाचा दहावी परीक्षेचा ९५.२७ टक्के निकाल

SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेत लातूर विभागाचा दबदबा कायम असून, राज्यातील १८३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहे. यात लातूर विभागाच्या १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूर मंडळाचा ९५.२७ टक्के निकाल लागला असून, लातूर पॅटर्नचा दबदबा यंदाही कायम आहे.
लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, विभागातून १ लाख ५ हजार७८९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. यातील १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. मंडळाकडून ४०८ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा ९५.२७ टक्के निकाल लागला आहे. लातूर जिल्ह्याचा ९६.४६, धाराशिव ९५.८८, तर नांदेड जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल लागला आहे. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही विभागीय मंडळात लातूर जिल्ह्याने अव्वलस्थान कायम ठेवले आहे.
शंभर टक्के घेणारे १५ विद्यार्थी वाढले...
२०२३ मध्ये राज्यात १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले होते. यात १०८ विद्यार्थी लातूर मंडळाचे होते. यंदाही राज्यात १८३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले असून, लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून, यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम आहे.