SSC Result: राज्यात लातूर बोर्ड तिसऱ्या स्थानी; ७० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:55 PM2022-06-17T14:55:56+5:302022-06-17T14:56:42+5:30
लातूर विभागीय मंडळाचा ९७.२७ टक्के निकाल : याही परीक्षेत मुलींचीच सरशी
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, लातूर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे. १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या राज्यातील १२२ विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील ७० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर लातूर बोर्ड राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे.
एकंदर, दहावीच्या निकालात लातूरचा दबदबा कायम आहे. दहावीच्या परीक्षेसाठी लातूर मंडळातून एकूण १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, यातील १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा ९६.६८, उस्मानाबाद जिल्ह्याचा ९७.८४ आणि लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल लागला आहे. तर विभागाचा ९७.२७ टक्के निकाल लागला आहे.
५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात...
लातूर विभागातील एकूण परीक्षार्थ्यांपैकी ५६ हजार १२२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व परीक्षार्थ्यांना ७५ टक्क्यांच्यावर गुण मिळाले आहेत. ३२ हजार २८९ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांच्या वर गुण घेतले आहेत. १२ हजार ६४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १९५० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. एकूण १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाले असल्याचे लातूर बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
लातूर बोर्डात मुलींचीच बाजी...
लातूर विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण ४८ हजार ४६७ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी ४८ हजार ५९६ मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ९८.२० टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर ५७ हजार ४२३ मुले दहावीच्या परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ५५ हजार ४०७ मुले पास झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४८ टक्के आहे. १.७२ टक्के मुली मुलांपेक्षा पुढे आहेत.