जुळ्या बहिणींचे गुणही जुळे ! अंकिता-निकिताचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 09:34 PM2022-06-17T21:34:17+5:302022-06-17T21:38:03+5:30
दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत.
लातूर : दिसायला अन् गुणांतही हुबेहूब अशी किमया साधणाऱ्या अंकिता, निकिता या दोघी जुळ्या बहिणीचे दहावी परीक्षेतील गुणही जुळे आहेत. एकसारखेच गुण मिळवून दोघींनी आपसातील सारखेपणा जपला आहे.
मूळचे कंधार तालुक्यातील कुरळा येथील भरत श्रीरामे चाकूर येथे खाजगी नोकरी करतात. त्यांना अंकिता आणि निकिता या दोन जुळ्या मुली आहेत. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रीरामे कुटुंबीय आनंदित झाले. आश्चर्य म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या अंकिता, निकितामुळे शेजारी, नातेवाईक आणि परिचितही गोंधळून जायचे. तसे निकालाच्या दिवशी दोघींनी ८७.६० टक्के एकसारखे गुण मिळवून सर्वांनाच आचंबित केले.
अंकिता कुरळा गावातील शिवाजी विद्यालयात दहावीला होती. ती आजी-आजोबांकडे राहते. तर निकिता भाई किशनराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेत आहेत असून, ती आईकडे असते. दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना ४३८ गुण मिळाले. आता त्या दोघीही लातूर येथे एकत्रित शिक्षण घेणार आहेत. दोघींचेही मुख्याध्यापिका सुनीता कोयले, शिक्षिका वर्षा सांगवीकर यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवारातून कौतुक होत आहे.