आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:59 PM2022-03-19T20:59:14+5:302022-03-19T21:00:02+5:30
गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांचा ताण-तणाव वाढला होता. यातच शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप वडील मधुकरराव चपटे यांनी केला आहे.
लातूर - निलंगा येथील आगारातील एका यांत्रिकी कर्मचाऱ्यास एसटी महामंडळाने ८ जानेवारी रोजी बडतर्फ केले होते. त्यामुळे हा कर्मचारी आर्थिक विवंचनेत होता. या ताण-ताणावातून त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सतीश मधुकरराव चपटे (४०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काही जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. येथील आगारातील यांत्रिकी विभागातील कर्मचारी सतीश चपटे यांना एसटी महामंडळाने ८ जानेवारी रोजी बडतर्फ केले होते.
दरम्यान, चार महिन्यांपासून वेतन नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांचा ताण-तणाव वाढला होता. यातच शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप वडील मधुकरराव चपटे यांनी केला आहे. मृत सतीश चपटे यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, निलंगा आगारातील एकूण ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कौटुंबिक जबाबदारी पेलण्यास असमर्थ झाल्याने माझ्या मुलाचा बळी गेला आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, प्रतिक्रिया मयत कर्मचाऱ्याचे वडील मधुकर चपटे यांनी दिली.