ST Strike: लातूर विभागातील २५६ एसटी कामगार बडतर्फ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:11 PM2022-02-05T18:11:05+5:302022-02-05T18:11:22+5:30
१०० दिवसांनंतही कामगार संपावर ठाम, गत साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत अद्यापही समाधानकारक ताेडगा निघाला नाही.
- राजकुमार जोंधळे
लातूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गत १०० दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर अद्यापही ताेडगा निघाला नाही. परिणामी, लातूर विभागातील पाच आगारांसमाेर सुरू असलेल्या संपात सहभागी असलेल्या एसटी कामागर, कर्मचाऱ्यांपैकी ३४३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, त्यातील २५६ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे.
गत साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाबाबत अद्यापही समाधानकारक ताेडगा निघाला नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कामगार, कर्मचारी ठाम आहेत. संपामध्ये सहभागी असलेल्या कामगारांवर महामंडळ प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ जणाची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. तर, ३४३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ९४ कामगारांची अन्य ठिकाणच्या आगारामध्ये बदली करण्यात आली आहे. लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगरातील एकूण ७०१ कामगारांवर सेवासमाप्ती, निलंबन, बदली आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. टप्प्या-टप्प्याने नाेटिसा बजावण्यात आलेल्या कामगारांची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
संपामध्ये १ हजार ६४८ कामगारांचा सहभाग...
लातूर विभागातील पाच आगारांसमाेर गत १०० दिवसांपासून सुुरू असलेल्या संपामध्ये सध्याला १ हजार ६४८ एसटी कामगारा सहभागी आहेत. लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात एकूण कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५५२ आहे. यातील ६८७ कामगार प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. ३५ जण गैरहजर आहेत. तर साप्ताहिक आणि रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १८२ आहे.
जिल्ह्यात शनिवारी विविध मार्गावर ८० बसेस धावल्या...
लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून शनिवारी विविध मार्गावर ८० बसेस धावल्या. यासाठी १४२ चालक, वाहक कामवर परतले आहेत. शिवाय, १५ वाहतूक नियंत्रकही वाहक म्हणून सेवा बजावत आहेत. आता टप्प्या-टप्प्याने महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे.