ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:41 IST2025-01-13T19:41:02+5:302025-01-13T19:41:08+5:30

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात

Start concessions in rail travel for senior citizens; Resolution passed in state-level convention of senior citizens | ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

लातूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासामध्ये सवलत होती. मात्र, ती सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. ही सवलत पुन्हा देण्यात यावी. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असा ठराव ज्येष्ठ नागरिकांच्या लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आला.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दहा ठराव करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात, दारिद्र्यरेषेची व्याख्या, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजारांच्या आत असले पाहिजे, हा निकष बदलण्यात यावा, ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ५ हजार रुपये पेन्शन चालू करावी, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व ज्येष्ठांना सुरू करावी, ज्येष्ठ नागरिक संघाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या जागेत स्वत:च्या उत्पन्नातून विरंगुळा केंद्र निर्माण करून द्यावीत, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा २००७ व नियम २०१० प्रमाणे कारवाईसाठी आदेश द्यावेत, पोलिस अधीक्षकांकडे आलेल्या केसेस त्वरित कारवाईसाठी आदेशित कराव्यात, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आता वृद्धाश्रम काळाची गरज निर्माण झाली आहे. शासकीय व खासगी वृद्धाश्रमात शासकीय अनुदान वाढवावे, ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात किमान ५० टक्के ज्येष्ठांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, हे ठराव पारित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोकराव तेरकर, अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, डॉ. निर्मलाताई कोरे, डॉ. बी.आर. पाटील, जगदीश जाजू, आर.जी. जोशी, प्रकाश घादगिने आदींची उपस्थिती होती.

आजी-आजोबांमुळे मुलांवर संस्कार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशन समारोपप्रसंगी बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, पूर्वी घरामध्ये आजी-आजोबा होते. त्यामुळे मुला-मुलींवर योग्य संस्कार होत असत. आता घरामध्ये आजी-आजोबा जड झाले आहेत. त्यामुळे मुले वाईट गोष्टीकडे वळत आहेत, ही बाब तरुण पिढीने लक्षात घेणे गरजेचे आहे. घरात ज्येष्ठांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आपल्या घरातील अडगळ न ठरता त्यांना वृद्धाश्रमात पाठविणे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी केला.

Web Title: Start concessions in rail travel for senior citizens; Resolution passed in state-level convention of senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.