जुन्या प्रकल्पाचेच काम सुरू करा; साैरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले
By राजकुमार जोंधळे | Published: September 9, 2023 10:53 PM2023-09-09T22:53:06+5:302023-09-09T22:54:32+5:30
महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.
बेलकुंड : ज्या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या, तो प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी करत शिंदाळा (लो.) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी शनिवारी महाजनकोकडून उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले.
औसा तालुक्यातील शिंदाळा (लो) शिवारातील जवळपास दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाकडून १३२ शेतकऱ्यांची ४५० एकरांवर जमीन भेल आणि महाजनकोच्या १५०० मेगावॅट वायू ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जमीन अधिग्रहण करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दहा-बारा वर्षांमध्ये नियोजित प्रकल्पासाठी काेणतीही हालचाल झाली नाही. दरम्यानच्या काळात वायू ऊर्जा प्रकल्पाच्या जागी राज्य सरकारने येथे अवघ्या ६० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली. शिवाय, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एका खासगी कंपनीला कंत्राटही दिले हाेते. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिलेले नोकरीचे आश्वासन अद्यापही हवेतच आहे.
प्रकल्पग्रस्तांचा केला विश्वासात...
शिवाय, सौरऊर्जा प्रकल्पात रूपांतर करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले नाही. याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महाजनकोच्या कार्यालयात अनेक खेटे मारूनही यश मिळाले नाही. परिणामी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेले काम शनिवारी बंद पाडले.
जमिनी परत करा; प्रकल्पगस्तांचा संताप...
वायू ऊर्जा वीज निर्मितीचा प्रकल्प उभा करा, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी संतप्त प्रकल्पग्रस्तांनी केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडले होते. तेव्हापासून कंपनीने काम बंद ठेवले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत कंपनीने पुन्हा कामाला सुरुवात केली हाेती. याची माहिती प्रकल्पग्रस्तांना मिळाल्यानंतर संतप्त शेतकरी, महिलांनी शनिवारी पुन्हा काम बंद पाडले.