सृष्टीच्या लावणीने सारे घायाळ;सलग २४ तास नृत्य करून केला एशिया वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 03:18 PM2021-01-27T15:18:49+5:302021-01-27T15:21:32+5:30
Dance Record सलग २४ तास नृत्य करताना दर एका तासाला तीन मिनिटे तिला थांबता येणार आहे.
- संदीप शिंदे
लातूर : येथील पोतदार स्कुलमध्ये नवव्या वर्गात शिकणारी सृष्टी जगताप हिने २४ तास नृत्य करण्याचा विक्रम केला आहे. तिने प्रजासत्ताक दिनी दुपारी ४.३० वाजेपासून लावणी नृत्य सादरीकरणास सुरुवात केली होती. बुधवारी दुपारी ४.३० वाजता सलग नृत्याचे २४ तास पूर्ण झाले असून या विक्रमाची नोंद एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनी दुपारी ४.३० वाजता लातूर शहरातील दयानंद सभागृहात सृष्टी जगताप हिने लावणी नृत्याला सुरुवात केली. सृष्टी जगताप हिने या अगोदरही अनेकदा सलग १२ तासापेक्षा जास्त काळ नृत्य सादर केलेले आहे. यावेळेला २४ तास सलग नृत्य करून एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविण्याचा तिचा प्रयत्न आहे. देशात आणि देशाबाहेर तिने आता पर्यंत वेगवेगळ्या नृत्य प्रकारातल्या स्पर्धात सहभाग नोंदवलेला आहे.
सलग २४ तास नृत्य करताना दर एका तासाला तीन मिनिटे तिला थांबण्याची परवानगी होती. याशिवाय डॉक्टरांची एक टिम दर दोन तासांनी तिची तपासणी करत. या रेकॉर्डसाठी एशिया बुक रेकॉर्डचे निरीक्षक उपस्थित होते. नृत्याचं २४ तास सलग व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणारी सृष्टीने वर्ल्ड रेकॉर्डवर नाव कोरले आहे. तिचे वडील सुधीर जगताप आणि आई संजीवनी जगताप हे दोघेही जिल्हा परिषदेच्या कारला (ता औसा ) येथील शाळॆत शिक्षक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. वयाच्या अडीच वर्षांपासून सृष्टीने नृत्य स्पर्धात यश मिळविले आहे.