कर्ज घेऊन उद्योग सुरु केला नाही;एसबीआयने ६ कर्जदारांविरुध्द दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:15 PM2019-07-26T13:15:02+5:302019-07-26T13:20:45+5:30
सहा कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (जि़ लातूर) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्जापोटी ७५ लाख रुपये उचलून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सहा कर्जदारांविरुध्द बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जदार किशोर रंगनाथ केंद्रे (रा. लोणी, ह. मु़ कुमठा खु़), वसंत माधराव म्हेत्रे (रा. जयप्रकाश नगर, नांदेड रोड, उदगीर), अविनाश व्यंकट लोहारे (रा. हावगीस्वामी चौक, निडेबन वेस, उदगीर), किशोर भानुदास कांबळे , भानुदास गंगाराम कांबळे (दोघेही रा. मलकापूर) व अजित बाबासाहेब पाटील (रा. कासराळ) यांनी १४ ऑक्टोबर २०१६ ते २ आॅगस्ट २०१८ या कालावधीत उदगीरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोलीस स्टेशनसमोरील शाखेतून प्राईममिनिस्टर एम्पलायमेंट जनरेशन प्रोग्राम स्कीमअंतर्गत उद्योगासाठी ८६ लाख ३७ हजार रुपये कर्ज उचलले़ तसेच १५ लाख ९० हजार रुपये के्रडिट कर्ज असे एकूण १ कोटी २ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज उद्योग करण्यासाठी घेतले़ परंतु उद्योग सुरु न करता ही रक्कम त्यांनी वैयक्तिक कामासाठी वापरली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या घेतलेल्या कर्जापैकी ७५ लाख २४ हजार १८५ रुपयांची सबसिडीसाठी त्यांनी हे कारस्थान केले. याप्रकरणी शाखेचे मुख्य व्यवस्थापक अलवारु सुब्रमन्यू व्यंकटय्या यांनी तक्रार दाखल केली.
सबसिडी मिळविण्यासाठी फसवणूक
आरोपींनी प्राईममिनिस्टर एम्पलायमेंट जनरेशन प्रोग्राम स्कीमअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून हे कर्ज उचलले. आणि कोणताही उद्योग सुरु न करता, त्यांनी ते वैयक्तिक कामासाठी वापरले. सदर स्कीमअंतर्गत मोठी सबसिडी मिळत असल्याने त्यांनी बँकेकडून हे कर्ज उचलले होते. मात्र, हे प्रकरण उघड झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.