Latur: राज्य क्रीडा दिन विशेष : मैदाने फुलविण्यासाठी ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ !

By राजकुमार जोंधळे | Published: January 14, 2024 09:04 PM2024-01-14T21:04:32+5:302024-01-14T21:04:45+5:30

Latur: क्रीडा संस्कृती रुजविण्यासह अधिकाधिक शालेय विद्यार्थी मैदानावर येण्यासाठी लातूरच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला असून, ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ या टॅग लाइनखाली मैदाने फुलविण्यासाठी क्रीडा चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे.

State Sports Day Special: 'Sports Mission for Latur' to flower the fields! | Latur: राज्य क्रीडा दिन विशेष : मैदाने फुलविण्यासाठी ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ !

Latur: राज्य क्रीडा दिन विशेष : मैदाने फुलविण्यासाठी ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ !

- राजकुमार जाेंधळे / महेश पाळणे
लातूर - क्रीडा संस्कृती रुजविण्यासह अधिकाधिक शालेय विद्यार्थी मैदानावर येण्यासाठी लातूरच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला असून, ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ या टॅग लाइनखाली मैदाने फुलविण्यासाठी क्रीडा चळवळ उभी करण्याचा संकल्प केला आहे.

१५ जानेवारी हा दिन राज्यभरात प्रथमच राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. २०२४ साली पहिल्यांदाच हा दिन ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या कामगिरीस उजाळा मिळावा या उद्देशाने साजरा केला जात आहे. राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे, जनतेत क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा दिन साजरा होत आहे. १९५२ साली फिनलँड येथील हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक (कांस्यपदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या कामगिरीस उजाळा मिळावा. त्यातून नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे.

तालुकानिहाय सर्व्हे...
जिल्ह्यातील तालुका संयोजकांच्या मदतीने जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत तालुकानिहाय सर्वेक्षण होणार असून, याअंतर्गत विविध शाळांना भेटी देऊन क्रीडाविषयक परिस्थितीचा यावेळी अभ्यास केला जाणार आहे. सध्या शालेय स्पर्धेच्या तिन्ही गटांत अनेक खेळांत खेळाडूंचा सहभाग अल्प असतो. यात वाढ होण्यासाठी हे मिशन राबविण्यात येणार आहे.

शिक्षण विभागालाही सोबत घेणार...
शिक्षण व क्रीडा या दोन्ही विभागाअंतर्गत समन्वय राखत हे मिशन काम करणार असून, राज्याचे क्रीडा मंत्री, जि. प.चे सीईओ, शिक्षणाधिकारी, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, विविध खेळांचे क्लब, अकॅडमी, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांची मदत घेत हे कार्य होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच समिती गठित केली जाणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यावर भर...
शालेय स्पर्धेपूर्वी अनेक शाळांचा सहभाग ऑनलाइन दिसत असतो. प्रत्यक्षात मात्र विविध खेळांत अनेक शाळांचे संघ तथा खेळाडू मैदानावर दिसत नाहीत. यासाठीही प्रयत्न होणार असून, अधिकाधिक ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत.

‘मिशन लक्षवेध’ला होणार मदत...
राज्य शासनाच्या वतीने ‘मिशन लक्षवेध’ ही नवीन योजना राज्यात राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत १२ ऑलिम्पिक क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, ग्रामीण भागातील टॅलेन्ट पुढे येण्यासाठी ‘स्पोर्टस् मिशन फॉर लातूर’ या अंतर्गत राज्याच्या ‘मिशन लक्षवेध’ या योजनेलाही या अंतर्गत फायदा होणार आहे.

लातूरच्या सुपुत्राचा पुढाकार...
मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी क्रीडा विभागाची धुरा हातात घेताच क्रीडा क्षेत्रासाठी विविध योजना राबविल्या. यासह खेळाडूंच्या बक्षीस व पुरस्काराच्या रकमेतही त्यांनी वाढ केली. विशेषत: राज्यात १५ जानेवारी हा दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही त्यांच्या काळात झाला.

क्रीडा क्षेत्राच्या अडचणी लक्षात घेणार...
या मिशनअंतर्गत विविध शाळांचा सहभाग, मैदानाची अडचण, प्रशिक्षकाची कमतरता यासह अनेक बाबींवर लक्ष देऊन जिल्ह्यात अधिकाधिक खेळाडू मैदानावर आणण्याचा उद्देश आहे. - जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडाधिकारी, लातूर.

Web Title: State Sports Day Special: 'Sports Mission for Latur' to flower the fields!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर