'महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही'; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
By संदीप शिंदे | Published: April 22, 2023 05:03 PM2023-04-22T17:03:41+5:302023-04-22T17:04:46+5:30
कव्हा नाका येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय महामार्गासाठी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु होत्या.
लातूर : शहरातील कव्हा नाका येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी डॉ. अरविंद भातांब्रे यांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण शनिवारी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले. कोरणेश्वर आप्पाजी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अवंती झुरळे, अक्षता भातांब्रे, आदिराज झुरळे या बालकांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन डॉ. भातांब्रे यांनी आपले उपोषण सोडले.
कव्हा नाका येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय महामार्गासाठी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु होत्या. हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये, या मागणीसाठी डॉ. अरविंद भातांब्रे, लक्ष्मण मुखडे, विवेकानंद स्वामी, आनंद जीवणे यांनी १९ एप्रिलपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. त्यामुळे प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकारी, मनपा प्रशासनाचा समन्वय घडवून हा पुतळा हटविण्यात येणार नसल्याचे लेखी पत्र डॉ. भातांब्रे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, माजी महापौर स्मिता खानापुरे, डॉ. मन्मथ भातांब्रे, वीरभद्रप्पा भातांब्रे, बसवराज धाराशिवे, राजा राचट्टे, प्रा. ओमप्रकाश झुरळे, लताताई मुद्दे, पूजा पंचाक्षरी, बाळाजीआप्पा पिंपळे, नितीन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, बसवंतप्पा भरडे, हामने अप्पा, मन्मथप्पा पंचाक्षरी, शरणाप्पा अंबुलगे, श्रीकांत हिरेमठ, सोनु डगवाले उपस्थिती होती. उपोषणाच्या यशस्वीतेसाठी संकेत उटगे, शिवानंद हैबतपूरे, केदार रासुरे, नरेश पेद्दे, सतीश पानगावे, राहुल नारगुंडे, सुनील ताडमाडगे, संतोष कळसे आदिंनी परिश्रम घेतले.