दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या

By हरी मोकाशे | Published: May 31, 2024 08:05 PM2024-05-31T20:05:08+5:302024-05-31T20:05:17+5:30

रेणापुरात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन

Stay at Renapur Tehsil Office for drought subsidy, crop insurance | दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या

दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या

रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान आणि पीकविमा देण्यात यावा. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रुपये प्रति टन भाव देवून त्यानुसार बिल अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे पीकविमा लागू करावा. केवायसीविना अनुदान वाटप करावे. मागील वर्षीचे अनुदान जमा झाले नाही. त्याची माहिती द्यावी. तलाठ्यांनी गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही, अशा खातेदारांची यादी तयार करावी आणि अनुदान तात्काळ वाटप करावे. तालुक्यातील किती शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्याची माहिती द्यावी. केवायसीचा प्रश्न सोडविण्यासाठी बँकेसोबत शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात यावी. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रूपयांप्रमाणे भाव द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे, संपर्कप्रमुख दत्ता शिंगडे, तालुका उपाध्यक्ष अच्युत मुळे, शेतकरी गोविंद माने, खलंग्रीचे उपसरपंच ज्ञानोबा वाघमारे, दिलीप बोकडे, सोपानराव लहाने, अशोक आगरकर, ज्ञानोबा काळे, निशांत देशमुख, अरविंद घाडगे, विठ्ठल येलाले, तुकाराम येलाले, प्रशांत गाडगे, ईश्वर बंडापल्ले यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १० जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयास टाळे ठोकून रेणापूर- पिंपळफाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सेनेचे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दिला आहे.

Web Title: Stay at Renapur Tehsil Office for drought subsidy, crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.