बिबट्या आल्याच्या दहशतीने आठवड्यापासून जागता पहारा, वनविभागाच्या गस्तीत आढळला तरस
By हरी मोकाशे | Published: May 18, 2024 06:51 PM2024-05-18T18:51:45+5:302024-05-18T18:55:58+5:30
आठवड्यापासून वन कर्मचारी आखाड्यावर खडा पहार देत आहेत
लातूर : चाकूर तालुक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने व काही पाऊलखुणा आढळल्याने त्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने दिवसरात्र गस्त सुरू केली आहे. आठवडाभरापासून या शिवारातील आखाड्यावर मुक्काम सुरु केला आहे. मात्र, शनिवारी पहाटे बिबट्या नव्हे तर तरस प्राणी शेतकऱ्यांना आढळला आहे.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील एका म्हशीच्या वासराचा वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे ५ मे रोजी निदर्शनास आले होते. त्याची माहिती नागरिकांनी दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यावरून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्यासदृश्य प्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या. त्याचे ठसे घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले.
९ कर्मचाऱ्यांचा शिवारात खडा पहारा...
बिबट्यासदृश्य प्राण्याचा माहितीवरुन ५ मे पासून चाकूरचे एक वनपाल व एक वनरक्षक रात्रंदिवस शिवणी व शिवणखेडच्या शिवारात मुक्कामी आहेत. दरम्यान, ११ मे पासून अहमदपूर, उदगीर, जळकोट येथील तीन वनपाल आणि चार वनरक्षक या शिवाराच्या आखाड्यावर खडा पहारा देत आहेत. शनिवारी पहाटे बिबट्या नव्हे तर तरस प्राणी आढळून आल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बिबट्या नव्हे, तरसाचा वावर...
शिवणखेड परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास तरस प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. परंतु, सतर्क रहावे. अशा प्राण्यांच्या अंगावर धावून जाऊ नये. अन्यथा तो प्रतिहल्ला करण्याची भीती अधिक असते. सदरील प्राण्यास लवकरात लवकर पकडून त्याच्या नैसर्गिक अधिकवासात सोडण्यात येईल.
- अश्विनी आपेट, वनपरिक्षेत्र अधिकारी.