दिल्या घरी 'होम क्वारंटाईन' राहा; नवरदेव संस्थात्मक, तर नवरी सासरी क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:12 PM2020-05-09T13:12:08+5:302020-05-09T13:15:17+5:30
लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.
- संदीप अंकलकोटे
चाकूर (जि. लातूर) : रीतीरिवाजाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे मुलीच्या दारी विवाह सोहळा झाला. तद्नंतर लातूरला सासरी निघालेल्या मुलीला दिल्या घरी सुखी राहा, असा आशीर्वाद माहेरच्यांनी दिला असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या घरी होम क्वारंटाईन राहा असा सल्ला दिला. परिणामी, नवरदेव संस्थात्मक क्वारंटाईन तर नवरीला सासरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे लग्न जरी झाले असले तरी अजून काही दिवस या जोडप्याला ‘कैसी ये जुदाई’ म्हणत दिवस कंठावे लागणार आहेत.
क्वारंटाईन १४ दिवसांचा असल्यामुळे नवविवाहित जोडप्यांना आता दोन आठवड्यानंतरच भेटता येणार आहे. गुरुवारी या दोघांसह विवाहाला उपस्थित राहिलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्येत ठणठणीत असली वा कोणतीही लक्षणे नसली तरी परजिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन करण्याचे निर्देश आहेत. त्याआधारे पूर्णा येथे ६ मे रोजीच्या विवाह सोहळ्याला गेलेल्या लातूररोड येथील एका परिवाराला क्वारंटाईन व्हावे लागले असून, संबंधित परिवारानेही उत्स्फूर्तपणे प्रशासनाला सहकार्य केले आहे.
पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, पोहेकॉ. प्रभाकरराव अंधोरीकर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी शंकर साबणे यांनी सदरील माहिती दिली. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या ७ पुरुषांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. तर नवरी व सासूला घरी होम क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, उदगीर तालुक्यातून आलेल्या एक महिला व एका बालकास लातूर रोड येथे आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन केले आहे.
विवाह सोहळ्यासाठी दोन वाहने
विवाह सोहळ्यासाठी दोन वाहने गेली होती. लातूर रोड ते पूर्णा व पूर्णा ते लातूर रोड असा प्रवास त्यांनी केला. संचारबंदीच्या काळातील हा प्रवास अचंबित करणारा आहे.