चोरीचे सत्र थांबेना; लातूर, चाकूर, सोनवती येथून पाच दुचाकी लंपास!
By संदीप शिंदे | Published: February 2, 2023 06:52 PM2023-02-02T18:52:25+5:302023-02-02T18:52:39+5:30
लातूर शहरात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून, लातूर शहरातून तीन, चाकूर आणि सोनवती येथून प्रत्येकी एक अशा एकूण पाच दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.लातूर शहरातील माधवनगर येथून एमएच १३ बी.व्ही. २६६३ क्रमांकाची दुचाकी घरासमोर पार्किंग केली होती. २८ जानेवारी राेजी अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी अनिल पंढरीनाथ जाधव यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह सारुळे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत लातूर शहरातील चंद्रनगर येथे पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एमएच २४ के ६१८२ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी बबन यादव ठोकळे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोह गोसावी करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत लातूरातील जिल्हा क्रीडा संकूल गेट नंबर २ येथे पार्किंग केलेली एमएच २४ एएच ७४६३ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने २९ जानेवारी रोजी लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी अजहर महेबुब शेख यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भताने करीत आहेत.
चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथून घरासमोर पार्किंग केलेली एमएच २४ एएम ०७३१ क्रमांकाची दुचाकी १८ ते १९ जानेवारीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी फिर्यादी चंद्रकांत भानुदास गुरमे यांच्या तक्रारीवरुन चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीची किंमत ३० हजार असल्याचे फिर्यादीत म्हंटले असून, तपास पोना मामडगे करीत आहेत.
चोरट्यांना शोधण्याचे पाेलिसांसमोर आव्हान...
लातूर तालुक्यातील सोनवती येथून एमएच २४ बीपी ७६७० क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने ५ डिसेंबर रोजी लंपास केली. याप्रकरणी किशोर राजेंद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरुन लातूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. क्रीडा संकूल, गंजगोलाईसह गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.